नवीन स्पोर्ट्स बाइक ठरली यमदूत; तीन बाईकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
By सुमित डोळे | Updated: July 11, 2023 12:55 IST2023-07-11T12:54:08+5:302023-07-11T12:55:23+5:30
नव्याने घेतलेल्या दुचाकीवर खुलताबाद च्या दिशेने चालले होते दोन जिवलग मित्र

नवीन स्पोर्ट्स बाइक ठरली यमदूत; तीन बाईकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांपूर्वीच नव्याने घेतलेल्या मित्राच्या स्पोर्ट्स बाइकवरून जाताना तीन दुचाकींचा विचित्र अपघात झाला, यात एका तरुणाचा मृत्यू झाला. आदर्श नारायण शिरसे (१८) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा मित्र किरण राजू चव्हाण (१८) हा गंभीर जखमी झाला. सोमवारी दुपारी पडेगाव-मिटमिटा रस्त्यावर हा अपघात घडला.
एन-५ परिसरातील गुलमोहर कॉलनीत राहणारे किरण व आदर्श दोघे जिवलग मित्र होते. सोमवारी त्यांनी खुलताबादकडे जाण्याचे ठरवले होते. दोघेही किरणच्या यामाहा स्पोर्ट्स बाइकवर (क्र. एमएच २० जीएम ८४४९) निघाले. दुपारी अडीच वाजता त्यांचा मिटमिटा रस्त्यावरील पठाण ढाब्यासमोर अपघात झाला. समोरून आलेल्या चारचाकी व दुचाकीने वेगात हूल दिल्याने दोघांचा तोल गेला व त्यात आदर्श व किरण जवळपास सहा ते सात फूट लांबपर्यंत फेकले गेले. मोतीवालानगरमध्ये राहणारा शायन खान अशरफ खान (१८) व शहदाब शरीफ शेख (२५, रा. बुढ्ढीलेन) हे देखील गंभीर जखमी झाल्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी सांगितले. अपघातानंतर स्थानिकांनी तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच या युवकांच्या नातेवाइकांसह मित्रांनी इस्पितळात गर्दी केली.
आदर्शचे कुटुंब कंधार तालुक्यातील
आदर्शचे कुटुंब मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. त्याचे वडील उच्च न्यायालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. आई, लहान भाऊ व तो गुलमोहर कॉलनीतील कोर्ट कॉलनीत राहत होते.