शिर कापलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; टोकाच्या 'वैयक्तिक' वादातून जिवलग मित्रांनीच केली हत्या
By सुमित डोळे | Updated: September 12, 2024 19:46 IST2024-09-12T19:45:57+5:302024-09-12T19:46:20+5:30
करमाड शिवारातील क्रूर हत्येचा झाला उलगडा; मुख्य आरोपी पसार, मात्र साथीदार अटकेत

शिर कापलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; टोकाच्या 'वैयक्तिक' वादातून जिवलग मित्रांनीच केली हत्या
छत्रपती संभाजीनगर : पिंपळगाव पांढरी शिवारात राजेश विजय कापसे (३५) यांची क्रुर हत्या करण्यात आली. मंगळवारी उघडकीस आलेल्या घटनेचा गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखा, करमाड पोलिसांनी उलगडा केला. राजेशचे मित्र दत्ता अमृत सुरवसे (३५), संतोष उध्दव जगताप (तिघेही रा. विजयनगर, गारखेडा) यांनीच 'टोकाच्या' वादातून हत्या केली. पोलिसांनी संतोषला अटक केली तर दत्ता हत्येनंतर पसार झाला आहे.
रंगकाम व्यावसायिक राजेश ८ सप्टेंबरला पत्नीला कामाचे कारण सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर घरी परतलेच नाही. सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने १० सप्टेंबर रोजी कुटूंबाने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायंकाळीच त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. मुंडकेच धडावेगळे करुन क्रुर हत्येमुळे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनिल लांजेवार, उपअधीक्षक सिध्देश्वर भोर यांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी सूचना केल्या होत्या.
दारुच्या दुकानात सोबत गेले, सीसीटीव्हीत कैद झाले आणि...
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिश वाघ, करमाडचे प्रभारी प्रताप नवघरे यांनी अंगावरील टॅटुमुळे ओळख पटवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश यांनी घर सोडल्यानंतर दत्ता, संतोषसोबत एकाच दुचाकीवर सुतगिरणी चौकाच्या दिशेने गेल्याचे दिसले. तेथे एका दुकानातून दारु खरेदी करुन ते झाल्टा फाट्याच्या दिशेने गेले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झाल्टा फाट्यावरुन ते करमाड शिवाराच्या दिशेने गेले. फुटेजमध्ये राजेश यांच्यासोबतचे दत्ता, संतोषची ओळख स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. संतोषला बुधवारी सायंकाळी ताब्यात घेत कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. हत्येनंतर दत्तासह त्याची पत्नी पसार आहे. दत्ताच्या अटकेनंतरच वादाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले. सहायक निरीक्षक सुधीर मोटे, पवन इंगळे, उपनिरीइक्षक दादाराव बनसोडे, रामेश्वर ढाकणे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवी लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे यांनी कारवाई केली.