मित्र फितूर झाल्यामुळे खुनी सापडला! २४ दिवसांनंतर टीव्ही सेंटर खून प्रकरणाचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 18:58 IST2022-02-15T18:58:03+5:302022-02-15T18:58:57+5:30
२० जानेवारीच्या मध्यरात्री टी.व्ही.सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्याखाली सिद्धार्थ भगवान साळवे (रा.सिद्धार्थनगर) याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला होता.

मित्र फितूर झाल्यामुळे खुनी सापडला! २४ दिवसांनंतर टीव्ही सेंटर खून प्रकरणाचा झाला उलगडा
औरंगाबाद : सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या दोघांपैकी एका मित्राला बोलते करण्यास सिडको पोलिसांना यश मिळाल्यामुळे तब्बल २४ दिवसानंतर टी.व्ही. सेंटर येथील खुनाचा उलगडा झाला. आरोपी अयाज खान बशीर खान (३६, रा. रहेमानिया कॉलनी) यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
२० जानेवारीच्या मध्यरात्री टी.व्ही.सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्याखाली सिद्धार्थ भगवान साळवे (रा.सिद्धार्थनगर) याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला होता. या घटनेमुळे शहर पोलीस दल हादरले होते. खुनाचा उलगडा करण्यासाठी सिडको ठाणे, गुन्हे, सायबर शाखा कामाला लागल्या होत्या. तरीही उलगडा होत नसल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाण्याला भेट देत आढावा घेतला. सिडको पोलिसांनी तब्बल १५० पेक्षा अधिक संशयितांची चौकशी केली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज काढले. तरीही सुगावा मिळत नसल्यामुळे पोलीस हतबल बनले. घटनेच्या रात्री साडेतीन वाजेच्या सुमारासचे एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात अयाज खान बशीर खान असल्याची पुष्टी मिळाली. त्यावरून अयाजसह त्याच्या बायकोचीही चौकशी केली, तरी उलगडा झाला नाही. अयाजच्या एका मित्राचीही चौकशी केली जात होती.
दोन दिवसांपूर्वी सिडकोच्या गुन्हे शाेध पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार हे पथकासह घटनास्थळी रात्रीच्या अंधारात कोण येते, याची माहिती घेण्यासाठी बसून होते. तेव्हा त्यांच्या पथकास अयाजचा मित्र तीन महिन्यांपासून घटनास्थळी झोपत होता, तो मागील २० दिवसांपासून त्याठिकाणी येत नसल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्याचे घर गाठून माहिती काढली. त्याला दारूच्या व्यसनामुळे वडिलांनी घरातून हाकलून दिले होते; पण तो सुधारला असल्याचा दावा करीत २० दिवसांपूर्वी घरी परतला होता. त्यावरून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने खुनाचा सर्वच घटनाक्रम उलगडून सांगितला.
मृताने डिवचल्यामुळे जीव गमावला
मृत सिद्धार्थने जेसीबीचालक अयाज यास दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यावरून वाद झाले. अयाजने सिद्धार्थला दांड्याने मारले. सिद्धार्थ स्टेडियमच्या पायऱ्यांच्या खालील मोकळ्या जागेकडे पळाला. अयाजही तेथे गेला. अयाजने सिद्धार्थच्या डोक्यात दगड घातला. पहिल्या फटक्यातच मेल्यामुळे त्याने मृतदेह जाळण्यासाठी पेटवला. त्यानंतर तो निघून गेला. हा सर्व प्रकार मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ही सर्व घटना अयाजच्या स्टेडियमच्या पायऱ्याखाली झोपणाऱ्या मित्राने पाहिली. तो घाबरून पळून घरी गेला. शेवटी त्यानेच दिलेल्या माहितीमुळे खुनाचा उलगडा झाला.
१५० संशयितांची चौकशी
सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी खुनाच्या घटनेत तब्बल १५०पेक्षा अधिक संशयितांची चौकशी केली आहे. या चौकशीत अयाजसह त्याच्या मित्रांचाही समावेश होता. मात्र सर्व पुरावे जुळल्यामुळे सिडको पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर उलगडा झाला. ही कामगिरी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पवार, विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक अशोक अवचार, हवालदार प्रकाश डोंगरे, इरफान खान, विजयानंद गवळी, विशाल सोनवणे, अमोल शिंदे, संदीप बिलारी, सागर शिरसाठ यांच्या पथकाने केली.