पोकरा घोटाळ्याची चौकशी पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतरही सुरूच
By बापू सोळुंके | Updated: August 22, 2023 19:49 IST2023-08-22T19:48:52+5:302023-08-22T19:49:11+5:30
या योजनेत गतवर्षी मधुमक्षिका पालन आणि शेततळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते.

पोकरा घोटाळ्याची चौकशी पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतरही सुरूच
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पोकरा) अंमलबजावणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून गैरव्यवहार करण्यात आल्याचे कळताच 'पोकराला पोखरलं' ही वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली होती. कृषी विभागाच्या आदेशाने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी २ ऑगस्ट रोजी नियुक्त समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र ही मुदत संपल्यानंतरही चौकशी पूर्ण झालेली नाही.
या योजनेत गतवर्षी मधुमक्षिका पालन आणि शेततळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. केवळ कागदोपत्री मधुमक्षिका पेट्या आणल्याचे दाखवून बोगस बिले सादर करण्यात आली होती. या घोटाळ्याचाच भाग बनलेल्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर थातूरमातूर चौकशी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू होता. ही बाब समजताच लोकमतने याविषयी वृत्तमालिका प्रकाशित केली. विभागीय कृषी सहसंचालक रमेश जाधव यांनी २ ऑगस्ट रोजी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पण, पंधरा दिवस उलटल्यानंतरही चौकशी पूर्ण झाली नाही.
भाड्याने आणल्या मधुमक्षिका पेट्या
सूत्रांनी सांगितले की, चौकशी समिती येणार असल्याचे कळताच शेतकऱ्यांनी एका टेम्पोतून मधुमक्षिकांच्या पेट्या ८ हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे भाडेतत्त्वावर शेतात आणून ठेवल्या आहेत. चौकशी होताच दुसऱ्या दिवशी या पेट्या संबंधित पेट्यामालक दुसऱ्या शेतात घेऊन जातात.
आणखी कर्मचारी दिले
या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय वेगवेगळ्या गावांतील लाभार्थी असल्याने त्यांच्या शेतात जाऊन पडताळणी करण्यासाठी वेळ लागतो. मधुमक्षिका पालन, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना आणि शेततळे इ. बाबींची तपासणी एकाच पथकाला शक्य नसल्याने त्यांच्या मदतीला गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील आणखी काही अधिकारी, कर्मचारी देण्यात आले आहेत.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक