उन्मत्त रेडा अखेर सापडला; कोंडवाड्यात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 07:18 IST2025-01-04T07:17:46+5:302025-01-04T07:18:32+5:30
शुक्रवारी सकाळी हिमायतबाग परिसरात हा उन्मत्त रेडा आढळून आला. पोलिसांसमक्ष या रेड्याला मनपाच्या पथकाने ताब्यात घेतले. सिद्धार्थ उद्यान परिसरातील कोंडवाड्यात रेड्याला ठेवण्यात आले.

उन्मत्त रेडा अखेर सापडला; कोंडवाड्यात रवानगी
छत्रपती संभाजीनगर : भडकल गेट परिसरातील नवखंडा पॅलेसमधील मॉडेल हायस्कूल येथे १ जानेवारी रोजी अचानक रेडा शिरला. या रेड्याने १४ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जखमी केले होते. दोन दिवसांपासून महापालिकेकडून या रेड्याचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळी हिमायतबाग परिसरात हा उन्मत्त रेडा आढळून आला. पोलिसांसमक्ष या रेड्याला मनपाच्या पथकाने ताब्यात घेतले. सिद्धार्थ उद्यान परिसरातील कोंडवाड्यात रेड्याला ठेवण्यात आले.
मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टतर्फे भडकल गेटवर वूमेन्स महाविद्यालय आणि मॉडेल हायस्कूल चालविण्यात येते. शाळा आणि महाविद्यालयासाठी एकच भव्य प्रवेशद्वार आहे. बुधवारी सकाळी १०:३० वाजता शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी उन्हात बसून डबे खात होते. सुसाट वेगाने शिरून रेड्याने १४ विद्यार्थ्यांना जखमी केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. जखमी विद्यार्थ्यांवर घाटीत उपचार करण्यात आले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनपाच्या सहकार्याने रेड्याचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळी रेडा हिमायतबाग परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेड्याला ताब्यात घेण्यात आले.
रेड्याचा मालक कोण?
या रेड्याचा मालक कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. रेड्याच्या मालकालाही आरोपी करावे, त्यालाही अटक करावी, अशी मागणी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.