महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार
By स. सो. खंडाळकर | Updated: September 14, 2022 20:33 IST2022-09-14T20:30:53+5:302022-09-14T20:33:02+5:30
या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार
औरंगाबाद : वेदांत- फाक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावापोटी व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेला, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घातला. हा करारच झाला नव्हता, असे कुणी म्हणत असतील तर ते धादांत खोटे आहे.
अजित पवार मुंबईहून विमानाने आले. सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, सरकारे येतात, जातात. दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यात आम्हाला कुठलेही राजकारण करायचे नाही. वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, हीच आमची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागा सवलती देण्यात आल्या होत्या
प्रकल्पासाठी तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने खूप मेहनत घेतली. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही मोलाचे प्रयत्न केले. दीड लाख कामगारांना काम देऊ शकणाऱ्या या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या. तरीही महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात मी पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राला वस्तुस्थिती सांगावी, असे आव्हान पवार यांनी दिले.