राज्यपालांचा पुन्हा दे धक्का; विद्यापीठ अधिसभेवर ९ जणांची नियुक्ती, चर्चेतील नावे मागे पडली

By योगेश पायघन | Published: January 14, 2023 01:13 PM2023-01-14T13:13:12+5:302023-01-14T13:13:36+5:30

सत्ताधारी भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, रिपाइं आठवले गटातून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे चर्चेत होती.

The governor's shock again; Appointment of 9 people on the Dr.BAMU's council, the names in discussion fell behind | राज्यपालांचा पुन्हा दे धक्का; विद्यापीठ अधिसभेवर ९ जणांची नियुक्ती, चर्चेतील नावे मागे पडली

राज्यपालांचा पुन्हा दे धक्का; विद्यापीठ अधिसभेवर ९ जणांची नियुक्ती, चर्चेतील नावे मागे पडली

googlenewsNext

औरंगाबाद : व्यवस्थापन परिषदेवर अनपेक्षित व्यक्तींची नियुक्त केल्यावर राज्यपाल कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठातील सक्रिय राजकारण्यांना पुन्हा धक्का दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर १० पैकी ९ सदस्यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. या यादीत ९ सदस्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४, बीड, जालना जिल्ह्यांतील प्रत्येकी २ व उस्मानाबाद जिल्ह्यातील एका सदस्याला संधी दिली. मात्र, यात आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांना स्थान दिले नाही, हे विशेष.

सत्ताधारी भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, रिपाइं आठवले गटातून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे चर्चेत होती. मात्र, त्यांना संधी मिळालेली नाही. अनेक इच्छुकांनी मंत्र्यांकडून शिफारशी होऊनही नावे डावलली गेल्याने नाराजी व्यक्त केली. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या कार्यालयाला नियुक्त सदस्यांबद्दलचे पत्र प्राप्त झाले. विविध क्षेत्रातील १० सदस्यांची नियुक्ती कुलपती यांच्या वतीने करण्यात येते. त्यापैकी ९ सदस्यांची नियुक्ती अधिसभेवर करण्यात आल्याचे कुलपतींचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी आदेशात म्हटले आहे. यामध्ये अरविंद वाल्मिक नरोडे, ॲड. अरविंद केंद्रे, केदार रहाणे व मनोज शेवाळे, अजय धोंडे व डॉ. विवेक पालवणकर, चत्रभुज गोडबोले व रवींद्र ससमकर, देविदास पाठक यांचा समावेश आहे.

अधिसभेवर ६८ सदस्य
विद्यापीठ अधिसभेवर पदवीधर, प्राचार्य व प्राध्यापक गटातून ३८ जण निवडून आले आहेत. पदसिद्ध सदस्य म्हणून २० जण कार्यरत आहेत. विधानसभेतून ज्ञानराज चौगुले यांचे नामांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठ अधिसभेवर आजपर्यंत ६८ सदस्यांची नावे प्राप्त झाली असल्याचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

८ जागा अद्याप रिक्त
विद्यापीठ अधिसभेवर मनपा, नगरपालिका; तसेच जिल्हा परिषद सदस्य (प्रत्येकी एक), विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी (प्रत्येकी एक) कुलगुरू यांच्या वतीने नियुक्त करण्यात येतात. चारही जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्याने या जागा रिक्त आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संसद अध्यक्ष व सचिव, विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य (प्रत्येकी एक) अशा ८ जागा रिक्त आहेत.

मार्चमध्ये सर्व अधिकार मंडळे येतील अस्तित्वात
मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अधिसभा घेण्यात येईल. त्यात व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका होतील. अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. अभ्यास मंडळांचे नाॅमिनेशन होतील. अध्यक्ष निवडल्यानंतर विद्या परिषदेसह विविध अधिकार मंडळे मार्चमध्ये अस्तित्वात येतील. त्यापूर्वी नवनियुक्त सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Web Title: The governor's shock again; Appointment of 9 people on the Dr.BAMU's council, the names in discussion fell behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.