शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी
By विकास राऊत | Updated: April 21, 2023 19:39 IST2023-04-21T19:39:30+5:302023-04-21T19:39:45+5:30
या निर्णयामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर : शासनाने मराठवाड्यासह इतर विभागांतील अधिकाऱ्यांना गुरुवारी सायंकाळी पदोन्नती दिल्याचे आदेश जारी केले. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांना ही अनोखी भेट दिली.
या निर्णयामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मराठवाड्यातील ५८ तहसीलदारांना गुरुवारी सायंकाळी उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली. तर ७८ नायब तहसीलदारांना तहसीलदार या पदावर पदोन्नती दिली आहे. मागील तीन वर्षांपासून पदोन्नत्या रखडल्या होत्या. २०२० पासून पदोन्नत्या होण्यासाठी इच्छुकांनी वाट पाहिली. परंतु, कोरोनामुळे पदोन्नत्या झाल्या नाहीत.
मराठवाड्यात २०११ मध्ये सेवेत आल्यानंतरही अनेकांना पदोन्नतीची संधी मिळाली नाही. त्या तुलनेत विदर्भात २०१५ मध्ये सेवेत आलेल्यांना पदोन्नती मिळाली. ही सापत्न भावना अनेकांच्या मनात खदखदत असताना शासनाने पदोन्नत्यांचा बार उडवला. त्यात मराठवाड्यातील १०० तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात २८ वर्षांपासून तहसीलदार या पदावर कार्यरत असलेल्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. गेल्या आठवड्यापासून शासनाने बदल्या करण्यास सुरुवात केली असून, आजवर ५४ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर हे आदेश जारी केले.