सरकारनेच केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन'; मुलींच्या जन्मदरात कुठे आहे वाढ?
By संतोष हिरेमठ | Updated: July 17, 2025 18:35 IST2025-07-17T18:30:16+5:302025-07-17T18:35:04+5:30
१३ केंद्रे दोषी : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ

सरकारनेच केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन'; मुलींच्या जन्मदरात कुठे आहे वाढ?
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये १३ सोनोग्राफी केंद्रांवर ‘गडबड’ हाेत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या केंद्रात गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचे भ्रूण गर्भातच खुडले जातात, असे आरोप सतत होत मुलींच्या जन्मदाराविषयी नेहमी चिंता व्यक्त होते. परंतु गेल्या ३ वर्षांत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे.
उपरोक्त ३ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर ९०० च्या खाली गेला होता. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि मुलींच्या भ्रूणांचा गर्भपात होत असल्याची शक्यता व्यक्त झाली. त्यामुळे आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदानाचा ‘उद्योग’ बंद करण्यासाठी पाऊल टाकले. याचा दृश्य परिणाम या तीन जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यात झाला आहे.
दर ३ महिन्याला तपासणी
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र प्रतिबंध कायदा १९९४ सुधारित अधिनियम २००३ अंतर्गत प्रत्येक सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तीन महिन्यांतून एकदा तपासणी केली जाते. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास केंद्रास कारणे दाखवा नोटीस काढली जाते. नोटीसचा खुलासा जिल्हा सल्लागार समितीसमोर ठेवून संबंधित केंद्रावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येते, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नावर दिली.
कसे केले स्टिंग?
गर्भलिंगनिदानाचा संशय असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भवती (डिकाॅय) महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले जाते. अशाप्रकारे राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९४ आणि एप्रिल व मे महिन्यात १३ असे १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग करण्यात आले. यात १३ केंद्रे दोषी आढळली. त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कुठे किती गुन्हे दाखल?
२०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला असून, सोनोग्राफी मशीन विक्रीबाबत जालना पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. तर बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी २ आरोपींना अटक झाली.
जिल्हानिहाय मुलींचा जन्मदर
जिल्हा - २०२२ - २०२३ -२०२४
बीड -८८८ - ८८३ -९६६
जालना -८५४- ८५७ - ९१९
छत्रपती संभाजीनगर - ८८६ - ८८० - ९२७