माहेरी आलेल्या लेकीला रस्ता नसल्याने बाळंतपणासाठी पाठवले नातेवाईकांकडे, कोणीच दाद देईना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:49 IST2025-12-16T19:47:46+5:302025-12-16T19:49:21+5:30
छत्रपती संभाजीनगरातील लक्ष्मी कॉलनीतील गंभीर प्रकार; समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकारणीही देईना दाद

माहेरी आलेल्या लेकीला रस्ता नसल्याने बाळंतपणासाठी पाठवले नातेवाईकांकडे, कोणीच दाद देईना!
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : घराचे गेट उघडल्याबरोबर समोर खोल नाला दिसावा, जरा पाय मागे पुढे सरकला तर थेट साधारण १५ फूट खोल नाल्यात पडाल, हा विचारच अंगावर काटे आणणारा आहे. मात्र, या परिस्थितीत गेली ३ महिने लक्ष्मी कॉलनीतील नागरिक राहत आहेत. दोन रस्त्यांना जोडणारा पूल ढासळलेला असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या पुलावर साधारणत: ३० ते ४० घरे अवलंबून आहेत. परिस्थिती इतकी भयावह आहे की, येथील एका कुटुंबाने बाळंतपणासाठी आलेल्या आपल्या लेकीला दुसऱ्या भागात नातेवाइकांकडे पाठवले आहे.
घरातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना नाल्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे किंवा पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. रात्री-अपरात्री कोणी आजारी पडले, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्ग काढवा लागत असल्याची स्थिती आहे.
सप्टेंबरमध्ये कोसळला पूल
सातारा परिसरात लक्ष्मी कॉलनीतील गट क्रमांक २०८ मध्ये २०२३ साली यसा नाल्यावर पूल बांधण्यात आला होता. मात्र २८ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टीत हा पूल कोसळला. तेव्हापासून परिस्थिती तशीच आहे. पुरुष नाल्यातून ये-जा करतात. मात्र, महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अनेक अडचणींतून मार्ग काढावा लागतो.
दाद कोणाकडे मागायची?
मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही याचा काहीच उपयोग झाला नाही. प्रत्यक्षात पूल बांधण्याचा प्रस्तावही अद्याप पुढे सरकलेला नाही. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडेही नागरिकांनी दाद मागितली. मात्र, तिथेही केवळ आश्वासनच मिळाले. प्रशासन आपली जबाबदारी झटकत असून राजकारणी दुर्लक्ष करत असल्याने या भागातील नागरिक अडचणीत येत आहे. ‘आता जाब तरी कोणाला विचारायचा?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
आम्ही कर भरतो, गुंठेवारी नियमितीकरणही झाले आहे, तरीही गेले काही महिने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
- संजय सरकटे, नागरिक
काम होणार नाही का?
२५ ते ३० जण मिळून आम्ही पालकमंत्री संजय शिरसाट यांना भेटायला गेलो. तब्बल चार तास वाट पाहिल्यावर भेट झाली. तात्काळ काहीच होऊ शकत नाही एवढेच ऐकायला मिळाले. काहीच होणार नसेल तर तसे स्पष्टपणे सांगावे.
- बाबूसिंग राजपूत, नागरिक
महिलांचे जगणेच कठीण
पूल ढासळल्यानंतर आम्हा महिलांचे जगणेच कठीण झाले आहे. साधी भाजी आणणे, मुलांना शाळेत सोडणेही धोक्याचे बनले आहे.
- दीपिका लाहोट, नागरिक