आगीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले; ५१ शेळ्यांचा होरपळून मृत्यू; कापूस, पाईप, धान्यही खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 19:38 IST2022-03-01T19:38:19+5:302022-03-01T19:38:56+5:30
यात शेडमध्ये बांधलेल्या ५१ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच संसारोपयोगी साहित्य, कापूस, १२० पीव्हीसी पाईप, खत, अन्नधान्य, टिन पत्रेही जळाली.

आगीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले; ५१ शेळ्यांचा होरपळून मृत्यू; कापूस, पाईप, धान्यही खाक
पानवडोद ( औरंगाबाद ) : शेतातील शेडला लागलेल्या आगीत ५१ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी डिग्रस शिवारात घडली. आगीत पाईप, धान्य, खत, पत्रे सुद्धा जळाल्याने एकूण १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.
पानवडोद येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाजीराव दौड यांचे डिग्रस शिवारात गट क्रमांक ७८ मध्ये शेती आहे. आज दुपारी काही कामानिमित्त दौड गावात गेले होते. दरम्यान, डिग्रस शिवारातील शेतात असलेल्या शेडला अचानक आग लागली. तेथे आग विझविण्यासाठी कुठलेही साहित्य नसल्याने व आगीची माहिती उशिरा मिळाल्याने शेडमधील सर्व साहित्य खाक झाले.
यात शेडमध्ये बांधलेल्या ५१ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच संसारोपयोगी साहित्य, कापूस, १२० पीव्हीसी पाईप, खत, अन्नधान्य, टिन पत्रेही जळली. आगीत जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान शेतकरी दौड यांचे झाले आहे. ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस, तलाठी रवींद्र कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल केला. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.