नागरिकांचे लचके तोडणाऱ्या श्वानाचा इतर मोकाट कुत्र्यांना चावा, नागरिकांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:50 IST2025-08-19T17:43:47+5:302025-08-19T17:50:02+5:30
जवळपास १४ जणांचे लचके तोडलेला पिसळलेला कुत्रा आढळला मृतावस्थेत

नागरिकांचे लचके तोडणाऱ्या श्वानाचा इतर मोकाट कुत्र्यांना चावा, नागरिकांची चिंता वाढली
छत्रपती संभाजीनगर : एन-७ सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांचे लचके तोडल्याची घटना रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली. हा श्वान रात्री मृतावस्थेत आढळल्याची माहिती महापालिकेच्या श्वान पथकाने दिली.
मोकाट कुत्र्याने अनेकांवर हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या श्वान पथकाने रविवारी रात्री एन-७ परिसरात धाव घेतली. तेव्हा सदर मोकाट श्वान मृतावस्थेत आढळला. या श्वानाने चावा घेतलेल्या अन्य एका मोकाट कुत्र्याला पथकाने ताब्यात घेतले. मृतावस्थेत आढळलेल्या या श्वानाने परिसरातील अनेक मोकाट कुत्र्यांनाही चावा घेतला होता. त्यामुळे अन्य मोकाट कुत्रेही पिसाळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
लसीकरण करणार
एन-७ परिसरातील इतर मोकाट श्वानांचेही लसीकरण केले जाईल, अशी माहिती प्रभारी पशू वैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांनी दिली.
इतर मोकाट कुत्र्यांची चाचणी करावी
छत्रपती संभाजीनगर येथील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी श्वानपथक यंत्रणा ही कमजोर सिद्ध झाली आहे. अनेक वर्षांपासून फक्त श्वान पथकावर पैसा खर्च करण्यात येतो. परंतु नागरिकांना जो कुत्र्यापासून त्रास आहे, तो अजूनही चालूच आहे. त्याचा सर्व भुर्दंड नागरिकांवर पडत आहे. एन-७ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या इतर मोकाट कुत्र्यांची वैद्यकीय चाचणी करून औषधोपचार करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे मनपाकडे केली आहे.
- रवींद्र तांगडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, छत्रपती संभाजीनगर.