माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र
By बापू सोळुंके | Updated: September 25, 2023 20:12 IST2023-09-25T20:06:39+5:302023-09-25T20:12:26+5:30
तसा 'चहा' पाजण्याची कल्पना बावनकुळेंची की त्यांच्या बॉसची - अंबादास दानवे

माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर: जनमत पक्षाच्या बाजूने व्हावे, यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन् जा, असे सांगणाऱ्या भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली की त्यांच्या पक्षाच्या बॉसने हे फर्मान जारी केले असा प्रश्न आहे. माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी केली.
आ. अंबादास दानवे यांनी याविषयी लोकमतची बातमी ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या, असा सल्ला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमे विकत घेण्याचेच फर्मान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काढले आहे. माध्यमे विकत घेऊन जनमत बदलता येतं या भंपक भ्रमामुळे बावनकुळे यांच्या सुपीत डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यानी एवढं सांगावं, हा अविष्कार त्यांचाच आहे की, त्यांच्या पक्षातील बॉस ने असे फर्मान जारी केले आहे, माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले दिसत नाहीत. कारण असे असते तर त्यांनी तुम्हाला माणिपूरचा आरसा दाखवला नसता. असले धंदे करून जनमतही बदलत नाही. कर्नाटक निवडणूक हे त्याचे जवळचे उदाहरण असल्याचे दानवे यांनी नमूद केले.
आपण सर्वांना आणि सगळं काही विकत घेऊ शकतो, या भंपक भ्रमामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यांनी एवढंच सांगावं, हा आविष्कार त्यांचा आहे की त्यांच्या पक्षातील बॉस ने असे फर्मान जारी केले आहे? माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून… pic.twitter.com/1OWpkiJ6yb
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 25, 2023
काय म्हणाले होते बावनकुळे
पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.