छत्रपती संभाजीनगर: प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव या ९३ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या रेल्वे मार्गासाठी औट्रम घाटात आता रेल्वेचा स्वतंत्र १७.५ कि.मी. लांबीचा बोगदा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा बोगदा देशातील सर्वात मोठा आणि लांब बोगदा ठरेल, असे खा. डॉ. भागवत कराड म्हणाले.
खा. कराड यांनी रविवारी रेल्वे स्टेशनवर पत्रकार परिषदेत, दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत मराठवाडा व परिसरातील रेल्वे जाळ्याच्या विस्ताराविषयी झालेल्या चर्चेची माहिती दिली. औट्रम घाटात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी एकत्रित बोगदा करण्यात येणार होता. मात्र, रेल्वेच्या तुलनेत रस्ते वाहतुकीचा बोगदा कमी अंतराचा होऊ शकणार आहे. त्यामुळे दोन्ही वेगवेगळे प्रस्ताव करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
धाराशिव - बीड - छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे कॉरिडॉरधाराशिव -बीड छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे कॉरिडॉर होत आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण भारताबरोबर रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढेल. यात छत्रपती संभाजीनर चाळीसगाव या ९३ कि.मी. च्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती डॉ. कराड यांनी दिली.
संभाजीनगर - अंकाई दुहेरीकरण वेगातछत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८.२५ कि.मी. अंतराच्या रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी ९६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या अंकाई ते करंजगावपर्यंतचे माती काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. पुलांचे काम झाल्यानंतर रेल्वे ट्रॅक टाकण्यात येईल. २०२७ पर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, असे डॉ. कराड म्हणाले.
रेल्वे ग्रेडियंट म्हणजे काय ?रेल्वे ग्रेडियंट म्हणजे रेल्वे रुळाची उंचीतील किंवा उतारातील वाढ किंवा घट. जेव्हा रेल्वे रुळ सपाट जमिनीवरून चढायला लागतो, तेव्हा त्याला ग्रेडियंट म्हणतात. ग्रेडियंट १०० 'डिग्री'च्या पुढे रेल्वे जाऊ शकत नाही. रस्ते वाहतुकीसाठी ग्रेडियंट १४० 'डिग्री' असेल तरी त्या बोगद्यातून वाहतूक होऊ शकते. त्यामुळे आता रेल्वेला स्वतंत्र १७.५ कि.मी. आणि रस्ते वाहतुकीसाठी ५.२ कि.मी. चा स्वतंत्र बोगदा लागेल.
संभाजीनगर- परभणी दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटीछत्रपती संभाजीनगर - परभणी या १७७.२९ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणासाठी २ हजार १७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच निविदा निघून काम सुरू होईल, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.
वेरुळ-घृष्णेश्वराला मिळेल रेल्वे कनेक्टिव्हीटीछत्रपती संभाजीनगर - कन्नड -चाळीसगाव या रेल्वेमुळे वेरुळ-ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरमार्गे तो जाईल. त्यामुळे वेरुळ-घृष्णेश्वरही रेल्वेच्या नकाशावर येईल.
'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दिली माहिती- प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ कि. मी. अंतराच्या रेल्वेमार्गाचा 'डीपीआर' केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.- हा रेल्वेमार्ग 'सिंगल' नव्हे, तर 'डबल २ लाइन'चा करण्यात येणार आहे. याविषयी 'लोकमत'ने १० ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले.- हा मार्ग विद्युतीकरणासह दुहेरी 3 लाइनचा होईल. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.