राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी
By संतोष हिरेमठ | Updated: September 8, 2025 20:02 IST2025-09-08T20:01:22+5:302025-09-08T20:02:06+5:30
मुंबईसाठी नवी रेल्वे द्याच; पण ‘राज्यराणी’कडे थोडं लक्ष द्या !

राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी
छत्रपती संभाजीनगर : जनशताब्दी, वंदे एक्स्प्रेस पळविल्यानंतर आता प्रवाशांना सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसचा एकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी पहाटे तीन वाजता उठण्याचीही प्रवाशांची तयारी आहे. मात्र, या रेल्वेच्या बोगींची, स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. शिवाय या रेल्वेत विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी रोखण्याकडेही दुर्लक्ष होते. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने थोडे लक्ष दिल्यास ही रेल्वे मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना अधिक सोयीची ठरेल.
पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आधी जालना आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. जालन्याहून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेसही नांदेडला पळविण्यात आली. या दोन्ही रेल्वे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांच्या फारशा सोयीच्या राहिल्या नाहीत. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडला पळविल्यानंतर मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली जाईल, असे सांगितले जाते. नवीन रेल्वे मिळेल तेव्हा मिळेल; परंतु आजघडीला मुंबईला लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने राज्यराणी एक्स्प्रेस महत्त्वाची ठरते; परंतु या रेल्वेच्या बोगीच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.
सीट्स म्हणजे निव्वळ बेंच
राज्यराणी एक्स्प्रेसमधील सीट्स म्हणजे निव्वळ बेंच आहेत. आरामदायी प्रवासच होत नाही. स्वच्छतागृहात पायही ठेवावा वाटत नाही. पेंट्री कारदेखील नाही, असे प्रवाशांनी सांगितले. राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईहून परतीचा प्रवास करताना लोकलचे प्रवासी, विनाआरक्षित प्रवासी आरक्षित बोगीत दमदाटी करून मिळेल त्या जागेवर ठिय्या मांडतात. आरक्षित तिकीटधारकाला ‘आमचे रोजचे आहे’, असे म्हणतात. खूप भयंकर अनुभव होता, असे अन्य एका प्रवाशाने ‘लोकमत’ला सांगितले.
सुसज्ज बोगींची गरज
राज्यराणी एक्स्प्रेस ही मुंबईला लवकर पोहोचण्यासाठी सोयीची आहे; परंतु बोगींची अवस्था वाईट आहे. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. एलएचबी कोच जोडल्या पाहिजेत.
- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ