युनिपोल उभारणीत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल तोडली ! मनपाला दहा पत्र, तरीही कारवाई नाही
By मुजीब देवणीकर | Updated: February 15, 2024 14:55 IST2024-02-15T14:54:53+5:302024-02-15T14:55:01+5:30
पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या बीओटीवरील कंपनीने मनपाच्या विद्युत विभागाला दहा पत्रे दिली.

युनिपोल उभारणीत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल तोडली ! मनपाला दहा पत्र, तरीही कारवाई नाही
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजकात मोठमोठे जाहिरात फलक (युनिपोल) उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत पोल उभारणीत पथदिव्यांची ४० ठिकाणी केबल तोडण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या बीओटीवरील कंपनीने मनपाच्या विद्युत विभागाला दहा पत्रे दिली. त्यानंतरही कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.
स्मार्ट सिटी प्रशासनाने प्रो ॲक्टिव्ह या खासगी कंपनीच्या सहकार्याने शहर बससेवेसाठी १२० ठिकाणी थांबे उभारले. हा खर्च कंपनीने त्यावरील जाहिरातींच्या माध्यमातून काढण्याचे ठरले. कंपनी सध्या शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात मोठमोठे लोखंडी युनिपोल उभारत आहे. पोल उभारणीच्या खड्ड्यामुळे १ फेब्रुवारी रोजी गॅस गळतीची घटना घडली होती. त्यानंतर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंपनीला काम थांबविण्याचे आदेश दिले होते. कंपनीने हे आदेश धुडकावून लावत जिथे फाउंडेशन उभारले होते, तेथे एका रात्रीतून पोल उभे केले.
बुधवारी ‘लोकमत’ने जालना रोडवर, विशेषत: खंडपीठासमोर, न्यायमूर्तींच्या निवासस्थानासमोर कशा पद्धतीने अंधार पडताेय, यावर ‘प्रकाश’ टाकला होता. यानंतर युनिपोल उभारणीत आतापर्यंत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल कापण्यात आल्याचे उघडकीस आले. पथदिव्यांची देखभाल करणाऱ्या कंपनीने मनपाच्या विद्युत विभागास पत्र पाठविले; पण मनपाने दखल घेतली नाही. केबल तोडल्यामुळे संपूर्ण रस्त्यांवरील पथदिवे बंद होत आहेत. केबल जोडणीसाठी लाखो रुपये खर्च येत आहे. पथदिव्यांना लागूनच युनिपोल उभारणी केल्याने विरुद्ध दिशेला अंधार पसरतोय. जालना रोडवर काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले. या ठिकाणी अपघाताची भीती आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या बस व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय सुपेकर यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
अनेक प्रश्न अनुत्तरित
-स्मार्ट बस थांब्याच्या निविदेत युनिपोल आहेत का.?
- सहा वर्षांनंतर ते आता का उभारले जात आहेत.?
- बसथांब्यावरील सोयी-सुविधांची पूर्तता का नाही.?
- युनिपोलसाठी मनपाच्या मालमत्ता विभागाची परवानगी का नाही?
- वाहतूक पोलिस, विद्युत विभागाला का कळविले नाही?
- पोल उभारणीसाठी जागा कोणी ठरवल्या?
कारवाई प्रस्तावित करतोय
इलेक्ट्रॉन कंपनीने केबल तोडल्यासंदर्भात विद्युत विभागाकडे पत्र दिले आहे. स्मार्ट सिटीच्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार होत आहे. वरिष्ठ पातळीवरच कारवाईसंदर्भात निर्णय होईल.
- फारूख खान, कार्यकारी अभियंता विद्युत, मनपा.