विहामांडवा-इंदेगाव मार्गावरील पूल अचानक कोसळला; उसाने भरलेला ट्रॅक्टर मध्येच लटकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:33 IST2025-12-13T19:32:16+5:302025-12-13T19:33:07+5:30
विहामांडवा-इंदेगाव हा प्रमुख वर्दळीचा मार्ग असून, ऊस वाहतूक, शेतमाल वाहतूक, रुग्ण व विद्यार्थ्यांची रोजची ये-जा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात केली जाते.

विहामांडवा-इंदेगाव मार्गावरील पूल अचानक कोसळला; उसाने भरलेला ट्रॅक्टर मध्येच लटकला
विहामांडवा ( छत्रपती संभाजीनगर) : इंदेगाव ते विहामांडवा या महत्त्वाच्या रस्त्यावर डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी रात्री अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. उसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला. प्रशासनाच्या सातत्याने झालेल्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला.
विहामांडवा-इंदेगाव हा प्रमुख वर्दळीचा मार्ग असून, ऊस वाहतूक, शेतमाल वाहतूक, रुग्ण व विद्यार्थ्यांची रोजची ये-जा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात केली जाते. दोन कारखान्यांना ऊस नेणारी शेकडो वाहने येथून अहोरात्र धावत होती. डाव्या कालव्यावरील हा पूल गेल्या काही दिवसांपासून तडे गेल्यामुळे धोकादायक स्थितीत होता. स्थानिकांनी सातत्याने दुरुस्तीची मागणी केली; मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. गुरुवारी (दि.११) रात्री आठच्या सुमारास शिवाजी पोकळे यांच्या मालकीचा उसाने भरलेला ट्रॅक्टर पुलावरून जाताना पुलाची संरचना अचानक खचली. ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी लटकून राहिला. यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला.
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत चालकाला बाहेर काढले. तुटलेल्या पुलावर लटकलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, रब्बी हंगामासाठी कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे कालवा पूर्णक्षमतेने वाहत होता. पूल कोसळल्याने येथून होणारी ऊस वाहतूक थांबली आहे. तसेच रुग्ण व विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कोसळलेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्वरित पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
बेसुमार वाळू उपसा
या पुलालगत वाहणाऱ्या विरभद्रा नदीचे पात्र असून, यातून मागील वर्षभरापासून वाळू उपसा सर्रासपणे सुरु आहे. अनियंत्रित बेसुमार उत्खननामुळे नदीकाठाची धूप वाढून कालवा व पुलाच्या पायाभूत संरचनेवर गंभीर परिणाम झाला. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूल कोसळल्याची घटना घडली.
वेळ मारून नेली
हा पूल मोडकळीस आला आहे. त्याला तडे गेलेले आहेत. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली. मात्र त्यांनी केवळ पंचनामा करून वेळ मारून नेली. पुलाची दुरुस्ती, वाळू उपशावर नियंत्रण काहीच केले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. पुलाच्या दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
- हरिपंडित नवथर, जिल्हाचिटणीस, भाजपा
तात्काळ दुरुस्त करावा
या कालव्यावरील प्रत्येक पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवे. पुलाची झालेली नुकसानभरपाई गुत्तेदाराकडून वसूल करावी. या पुलामुळे उसाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूल तात्काळ दुरुस्त करावा.
-संजय निंबाळकर, माजी उपसंचालक व समाजसेवक