वधू-वरांना बाहोल्यावर चढण्यासाठी करावी लागेल प्रतीक्षा; नवीन वर्षात थेट फेब्रुवारीतच लग्नतिथी!
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 8, 2025 19:36 IST2025-12-08T19:36:15+5:302025-12-08T19:36:15+5:30
लग्नाच्या धामधुमीला ब्रेक; ज्यांचे लग्न जमले आहे. मात्र, लग्नतिथी ठरवायची आहे. त्यांना फेब्रुवारी २०२६ च्या ४ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

वधू-वरांना बाहोल्यावर चढण्यासाठी करावी लागेल प्रतीक्षा; नवीन वर्षात थेट फेब्रुवारीतच लग्नतिथी!
छत्रपती संभाजीनगर : तुमच्या मुला-मुलीचे लग्न जमले आहे; पण प्रत्यक्षात लग्न करण्यासाठी तुम्हाला थेट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण, आता तब्बल ६१ दिवस पंचांगकर्त्यांनी लग्नमुहूर्त दिला नाही. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांना बाहोल्यावर चढण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका मॅरेज इंडस्ट्रीला सहन करावा लागणार आहे.
कशामुळे वधू-वरांना करावा लागेल विरह सहन
शुक्रवार, ५ तारीख या लग्नहंगामातील अखेरची तारीख ठरली. आता १४ डिसेंबरपासून ‘शुक्रा’चा अस्त असल्याने पंचांगकर्त्यांनी लग्नतिथी दिल्या नाहीत. ज्यांचे लग्न जमले आहे. मात्र, लग्नतिथी ठरवायची आहे. त्यांना फेब्रुवारी २०२६ च्या ४ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून लग्नाच्या धामधुमीला सुरुवात होईल. तोपर्यंत वधू-वरांना विरह सहन करावा लागणार आहे.
पुढील वर्षी मुख्य काळातील ४६ लग्नतिथी
फेब्रुवारी २०२६ : ३,५,६,७,८,१०,११,१२,२०,२२,२५,२६.
मार्च : ५,७,८,१२,१४,१५,१६.
एप्रिल : २१,२६,२८,२९,३०.
मे : १,३,६,७,८,९,१०,१३.
जून : १९,२०,२२,२३,२४,२७.
जुलै : १,२,३,४,७,८,९,११.
डिसेंबर, जानेवारीत लग्नतिथी आहेत; पण...
वेशासं.सुरेश केदारे गुरुजी यांनी सांगितले की,
आपतकालीन परिस्थितीत लग्न करण्यासाठी पंचांगकर्त्यांनी काही गौण काळातील लग्नतिथी दिल्या आहेत.
यात डिसेंबर : १२, १३, १५.
जानेवारी २०२६ : २०,२३,२४,२५,२६,२८,२९.
या १० लग्नतिथी दिल्या आहेत; पण या गौणकाळात कोणी लग्न करावे हेसुद्धा नमूद केले आहे.
ज्यांचा साखरपुडा झाला आहे आणि घरातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती अति आजारी असेल व त्यांच्या समोरच लग्न करायचे असेल, तसेच मुलगा किंवा मुलगी दोघही विदेशात नोकरीला असतील व त्यांना नंतर व्हिसा मिळण्यास अडचणी येत असतील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे निधन झाले असेल, अशा परिस्थिती आपतकालीन लग्नतिथीवर लग्न लावता येते; पण शक्यतो मुख्यकाळातील लग्नतिथीवरच लग्न लावलेले चांगले.
मॅरेज इडस्ट्रीला फटका
आता पुढील ६१ दिवस मुख्य काळातील लग्नतिथी नसल्याने याचा मोठा फटका मॅरेज इंडस्ट्रीला बसणार आहे. यात ५० हजारांपेक्षा अधिक लोकांना थेट हंगामी रोजगार मिळतो त्यातील बहुतांश जणांच्या हाताला आता काम नाही. शहरात १० प्रमुख इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, ५० प्रमुख केटरर्स व ५० क्षेत्रातील व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल थांबली आहे.