छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरुद्ध पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत लेखी उत्तर दाखल करण्यासाठी वकिलांनी वेळ मागून घेतला.
त्यामुळे या याचिकेवर आता ४ आठवड्यांनी म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांच्यापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.
उभय पक्षांचे म्हणणे
राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत शिरसाट यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. शिरसाट यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. ॲड. देशमुख यांनी खंडपीठास विनंती केली की, शिरसाट यांच्याविरुद्धच्या आरोपावरील त्रुटीची याचिकाकर्त्याने पूर्तता केलेली नसल्याने ही निवडणूक याचिका फेटाळून लावावी. तसेच शिंदे यांच्या वतीने लेखी उत्तरही दाखल करण्यात आले नसून, आमचा दावा ‘रेकाॅर्ड’वर घ्यावा, अशीही विनंती त्यांनी केली. त्यावर शिंदे यांच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी ४ आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे. ॲड. राजेंद्र देशमुख यांना ॲड. मुकुल कुलकर्णी, ॲड. अमोल जोशी, ॲड. अभयसिंह भोसले आणि ॲड. श्रीराम देशमुख सहकार्य करीत आहेत.