व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजचा राग; तरुणीचे घरात घुसून अपहरण, बनवला अश्लील व्हिडीओ
By सुमित डोळे | Updated: October 12, 2023 12:03 IST2023-10-12T11:58:06+5:302023-10-12T12:03:29+5:30
पडेगाव परिसरात कारमध्ये टाकून नेले

व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजचा राग; तरुणीचे घरात घुसून अपहरण, बनवला अश्लील व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकल्याच्या रागातून एका तरुणीच्या घरात घुसून अश्लील कृत्य करत बळजबरीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पडेगाव भागात ही घटना घडली. नंतर आरोपींनी तिला सोडले. तरुणीच्या तक्रारीवरून मुकेश राठोड, राणी, संगीता ऊर्फ मनीषा आणि मुकेशच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.
२७ वर्षीय फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार, मंगळवारी ती एकटी घरी होती. दुपारी २ वाजता आरोपी मुकेश मित्रासह तिच्या घरी गेला. ‘तू आमच्या विरोधात व्हाॅट्सॲप ग्रुपवर मेसेज का टाकते’, असे विचारत त्यांनी तिचा विनयभंग केला. तिच्या वहिनीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिच्यावरही हात उगारला. चाकूचा धाक दाखवून मुकेश आणि त्याच्या मित्राने तरुणीला बळजबरीने कारमध्ये (एमएच-२०-८०५५) बसवून छावणी पोलिस ठाण्याच्या परिसरात नेले.
कारमध्ये तिच्याकडून आरोपींनी व्हिडीओ तयार केला. कारमध्ये राणी, संगीता ऊर्फ मनीषा, मुकेश आणि त्याचा मित्र होता. तेथून पुन्हा सूतगिरणी चौकात रविकांत राठोड यांच्याकडे घेऊन जात राणी, रविकांत आणि मुकेश यांनी तिला मारहाण करून सोडून दिले. उपनिरीक्षक गणेश केदार अधिक तपास करीत आहेत.