नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा मेळ अजून काही जमेना; प्रत्येकाला हवाय सोयीचा सवता सुभा

By विकास राऊत | Updated: November 14, 2025 16:00 IST2025-11-14T15:59:32+5:302025-11-14T16:00:17+5:30

राजकारणाचा धुराळा: प्रत्येक आमदाराला स्वत:ची मर्जी निवडणुकीत चालवायची आहे. त्यामुळे प्रभारी नेमले, निरीक्षक नेमले असले तरी आमदार म्हणतील तीच पूर्व दिशा निवडणुकीत ठरणार असल्यामुळे महायुतीचा मेळ अजून जमलेला नाही.

The alliance has not yet reached a consensus in the municipal council elections; everyone wants the autonomie for their own convenience | नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा मेळ अजून काही जमेना; प्रत्येकाला हवाय सोयीचा सवता सुभा

नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा मेळ अजून काही जमेना; प्रत्येकाला हवाय सोयीचा सवता सुभा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ६ नगर परिषद आणि १ नगरपंचायतीच्या राजकारणाचा धुराळा सध्या उडतोय. आमदारांच्या ताकदीचा आणि स्वत:च्या मर्जीतील मंडळी निवडून आणण्यासाठी कस लावणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत महायुती होण्याचा मेळ जमणार नसल्याचे चित्र सध्या असून सगळ्यांनीच आपापल्या ताकदीने उमेदवारांची यादी तयार केली आहे. परिणामी, उमेदवार अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबरची अंतिम मुदत असताना १६० सदस्य आणि ७ नगराध्यक्षपदांपैकी चार ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तर सदस्य होण्यासाठी ३४ अर्ज आले आहेत.

प्रत्येक आमदाराला स्वत:ची मर्जी निवडणुकीत चालवायची आहे. त्यामुळे प्रभारी नेमले, निरीक्षक नेमले असले तरी आमदार म्हणतील तीच पूर्व दिशा निवडणुकीत ठरणार असल्यामुळे महायुतीचा मेळ अजून जमलेला नाही. निवडणुकीनंतर युती केल्यास योग्य राहील, असा सूर सध्या भाजप व शिंदेसेनेतून आळविण्यात येत असल्याची चर्चा आहे.

भाजप आणि शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह इतर नेत्यांनी ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. महायुतीत लढायचे की स्वबळावर, याचा अंतिम निर्णय होईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व आठवले गटदेखील महायुतीमध्ये आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या हद्दीत ८७ प्रभागांत १६० उमेदवार निवडणूक लढविणार असून, ८२ प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. न. पं. निवडणुकीत २ लाख ३४ हजार १६३ मतदार आहेत.

सिल्लोड न.प...
आ. अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. नगराध्यक्षांसह २८ सदस्य असलेली ही नगरपरिषद आहे. भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीचा मेळ अद्याप येथे जमलेला नाही. आ. सत्तार यांच्या मर्जीनुसारच या नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णय होण्याची चर्चा आहे.

कन्नड न.प....
आ. संजना जाधव यांची मर्जी निवडणुकीत चालेल. भाजपचे काही मातब्बर नेते देखील आ. जाधव यांना आतून मदत करत आहेत. त्यामुळे भाजप येथे नाराज आहे. २५ सदस्य असलेल्या नगरपरिषदेत भाजपचे काही नेतेच शिंदेसेनेला मदत करत असल्याची चर्चा आहे.

वैजापूर...
या नगरपरिषदेत २५ सदस्य आहेत. आ. रमेश बोरनारे शिंदेसेनेच्या वर्चस्वासाठी आग्रही आहेत तर भाजपला देखील नगरपालिका ताब्यात हवी आहे. दोन्ही पक्षांची ताकद येथे असल्यामुळे खेचाखेचीत युती होण्याची शक्यता धूसर आहे.

पैठण न.प....
२५ सदस्य असलेल्या नगरपरिषदेसाठी शिंदेसेनेचेे आ. विलास भुमरे यांनी युतीसह किंवा युतीविना निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वी निवडणूक प्रभारी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. युतीचा निर्णय अद्याप झाला नाही.

खुलताबाद व गंगापूर...
या दोन्ही नगरपरिषदा भाजप आ. प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात आहेत. भाजपने आ. बंब यांच्यावर पूर्ण जबाबदारी देऊन टाकली आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार ते निर्णय घेणार असल्यामुळे येथेही युती होण्याची शक्यता कमीच आहे. गंगापूर न.प.मध्ये २० तर खुलताबाद न.प.मध्ये २० सदस्यसंख्या आहे.

फुलंब्री नगरपंचायत...
१७ सदस्य असलेली ही नगर पंचायत भाजप आ. अनुराधा चव्हाण यांच्या मतदारसंघात आहे. त्या आमदार झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे भाजपच्या विजयासाठी त्या पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याची चर्चा आहे. येथेही युतीचे सूर सध्या जुळत नसल्याचे दिसतेय.

Web Title: The alliance has not yet reached a consensus in the municipal council elections; everyone wants the autonomie for their own convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.