बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम; लहान मुलांनाही संधिवात, तेही वयाच्या दहाव्यावर्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:51 IST2022-04-18T13:49:43+5:302022-04-18T13:51:53+5:30
ताप, गुडघ्याला सूज, मूल सुस्त राहणे, मुलांचे खेळणे कमी होणे अशी त्याची लक्षणे आहेत.

बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम; लहान मुलांनाही संधिवात, तेही वयाच्या दहाव्यावर्षी
औरंगाबाद : संधिवात म्हटला की प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार, असाच समज आहे. मात्र, लहान मुलांमध्येही आता या आजाराचे निदान होत आहे, तेही अवघ्या १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये. हा आजार दुर्मिळ नाही; परंतु त्याचे निदान वेळीच होत नसल्याची चिंता बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली.
शहरात आयोजित केलेल्या दोनदिवसीय बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेचा रविवारी समारोप झाला. सकाळच्या सत्रात डॉ. नीती सोनी यांनी, मुले किशोर वयात आल्यानंतर घ्यावयाची काळजी, यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. मुलांमधील स्वमग्नता वेळीच कशी ओळखावी, यावर डॉ. अंजली बेंगलोरे यांनी मत मांडले. डॉ. राजू खूबचंदानी यांनी लहान मुलांमधील संधिवात, यावर केलेले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन समारोपाप्रसंगीचे महत्त्वपूर्ण सत्र ठरले.
अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, जेनेटिक या कारणांमुळे मुलांमध्येही संधिवात आढळत आहे. ताप, गुडघ्याला सूज, मूल सुस्त राहणे, मुलांचे खेळणे कमी होणे अशी त्याची लक्षणे आहेत. याचे निदान वेळीच होणे गरजेचे आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असल्याचे डाॅ. खूबचंदानी म्हणाले.
परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे डॉ. राजेंद्र खडके, समन्वयक डॉ. राजश्री रत्नपारखे, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. मंदार देशपांडे, डॉ. मंजुषा शेरकर, डॉ. अभिजित परळीकर,डॉ. समीर जोशी, डाॅ. रोशनी सोधी, डाॅ. अभय जैन, डाॅ. प्रशांत जाधव आदींनी परिश्रम घेतले.
तापाची एक नव्हे, अनेक कारणे
डाॅ. जी. व्ही. बसवराज म्हणाले, लहान मुलांमध्ये अनेक कारणांमुळे ताप येतो. सर्वसामान्यपणे ३ ते ४ दिवसांपर्यंत ताप बरा होतो. ताप का येतो, याचे निदान करणे गरजेचे असते. मुलांना स्वच्छ पाणी देणे, सकस आहार देणे यासह त्यांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
तालुका पातळीवर डाॅक्टरांचा सहभाग
अगदी तालुका पातळीवरील बालरोगतज्ज्ञांना परिषदेत आपले अनुभव आणि मत मांडण्याची, तज्ज्ञांचा अनुभव ऐकण्याची संधी मिळाल्याने ही परिषद मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली, असे डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. संध्या कोंडपल्ले म्हणाल्या.