२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:45 IST2025-12-19T16:40:08+5:302025-12-19T16:45:06+5:30
पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेना २०१५ च्या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप करण्याचा मुद्दा पुढे रेटत असून, या निवडणुकीतील जागा वाटपात तो मुद्दा आता मान्य होणार नाही. फिप्टी-फिप्टी जागा वाटप करण्याबाबत एकमत केले तरच युतीचे सूर जुळतील, अन्यथा युतीच्या निर्णयाची सूत्रे प्रदेश कार्यालयाकडे देण्यात येतील. प्रदेश कार्यालयाच्या निर्णयानुसार आम्ही पुढे जाऊ, असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना गुरूवारी चिकलठाणा येथील मुख्य विभागीय कार्यालयात सुरुवात झाली. मुलाखती घेतल्यानंतर सावे यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
काय म्हणाले मंत्री सावे...
शिवसेना मोठा भाऊ व भाजप धाकटा भाऊ ही २०१५ सालची स्थिती होती. आता तशी परिस्थिती नाही. भाजपची ताकद वाढली आहे. नवीन धोरणानुसार जागा वाटप झाले पाहिजे. २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेने जास्त जागा लढल्या होत्या. भाजपने कमी जागा लढल्या होत्या. परंतु, १० वर्षांत भाजपने प्रत्येक वॉर्डात विकासकामे केली. सध्या भाजपमधील इनकमिंग पाहता तुलनेत भाजप खूप पुढे निघून गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचे मॉडेल आणले आहे.
फिप्टी-फिप्टी जागा नाही मिळाल्या तर...
फिप्टी-फिप्टी जागा नाही मिळाल्या तर आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे चर्चा करू. आमची ताकद वाढलेली आहे. मोठ्या भावासारखी आमची स्थिती आहेच. त्यामुळे २०१५ चा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता चालणार नाही. कमीत कमी ५० टक्केे जागा मिळाव्यात. मित्रपक्ष आरपीआय, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाला त्यांच्या ताकदीनुसार फिप्टी-फिप्टीतून जागा देऊ.
हा शेवटचा अल्टीमेटम असेल...
हा शेवटचा अल्टीमेटम असेल का? यावर सावे म्हणाले, असे नाही. ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत. आमदार शिंदेसेनेचे जास्त असल्याचे ते सांगत असले तरी आमच्यासह सगळे आमदार, खासदार महायुतीमध्ये निवडून आले आहेत. स्वतंत्र लढण्याच्या तयारीबाबत सावे म्हणाले, स्थानिक पातळीवर आमचे एकमत झाले नाही तर आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे बाजू मांडू. स्वतंत्र लढणे, आमची निवडणूक तयारी याबाबत प्रदेश पातळीवरून जे आदेश असतील, त्यानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ.
माझी मुले बॅक ऑफीस सांभाळतील : सावे
सध्या भाजपमधील आमदार, खासदार, मंत्र्यांची मुले, बहीण, मुली मनपा निवडणुकीच्या मैदानात येत आहेत. तुमची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर मंत्री सावे म्हणाले, माझी मुले निवडणुकीची वॉररुम, बॅक ऑफीस सांभाळतील. नेत्यांच्या नातलगांच्या उमेदवारीबाबत सर्वानुमते निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती झाल्यास काय होईल....
महायुती झाल्यास बंडखोरीची शक्यता जास्त आहे. नाराज होऊन अनेकजण निवडणुकीला उभे राहतील. ही परिस्थिती सेना-भाजप या दोन्ही पक्षांत आहे. महायुती तुटल्यास सर्वांना संधी मिळणे किमान शक्य होईल का, विरोधकांना रेडिमेड उमेदवार मिळू नयेत, यासाठी महायुतीचे नेते येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेतील. त्यातही फिप्टी-फिप्टी जागेचा अजेंडा प्राधान्य क्रमावर असेल, असे सावे यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक भाजपमध्ये...
ठाकरे गटाचे बेगमपुऱ्याचे माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. संजय फत्तेलष्कर, नंदकुमार जोशी, विजय सोनटक्के आदींनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. पांडे व त्यांचे समर्थक उमेदवारीसाठी पक्षात आले नाहीत, असे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.