१११ वर्षांच्या सगर महोत्सवात हेल्यांचा थाट, कसरती केल्या, काही रूसलेही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:35 IST2025-10-25T14:31:17+5:302025-10-25T14:35:02+5:30
सगर महोत्सवात आलेल्या पशूपालकांना मानाची टोपी व उपरणे देऊन स्वागत केले जात होते.

१११ वर्षांच्या सगर महोत्सवात हेल्यांचा थाट, कसरती केल्या, काही रूसलेही
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या चोहीबाजूने असलेल्या गोठ्यातून गुरुवारच्या दिवशी सजविलेल्या हेल्यांची (सगर) डफ, हलगी वाजवत मिरवणूक काढण्यात आली. सुमारे ७० पेक्षा अधिक हेल्यांना गवळीपुऱ्यात आणण्यात आले. कोणी दोन पायावर उभे राहून सलामी दिली, तर काही हेले एवढे रुसलेकी, त्यांना फराळाचे खायला दिले, तरीही त्यांनी खाल्ले नाही. दिवसभर ‘उपवास’ केला म्हटले, तर वावगे ठरणार नाही. वीरशैव लिंगायत गवळी समाज व जनसेवा क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा केला.
हेल्यांचा साज आणि सजावट
शहर व परिसरातील पशुपालक हेल्यांना घेऊन सगर महोत्सवात दाखल झाले होते. प्रत्येक हेल्याचा साज अनोखा-मानेवर मोरपिसांचा साज लावून, अंगावर नक्षीकाम, पायात चांदीचे कडे, गळ्यात घुंगरांची माळ आणि चमकीचा झगमगाट, प्रत्येक हेला जणू कलाकृतीच वाटत होता.
संस्थान गणपती मंदिरासमोर नतमस्तक
अनेक पशूपालकांनी हेल्यांकडून विविध कसरती करून घेतल्या. या कसरती पाहण्यासाठी नवाबपुरा चौकात मोठी गर्दी झाली होती. पाठीमागील दोन पायांवर उभे राहून काही हेल्यांनी येथे सलामी दिली. संस्थान गणपती मंदिरासमोर मिरवणूक येताच दोन पाय समोर व खाली मान घालून गणपती समोर नतमस्तक झाले.
डफडे-नगारेच्या तालावर युवकांचा जल्लोष
हेल्यांच्या मिरवणुकीत भारतीय पारंपरिक वाद्यांचा निनाद घुमत होता. डफडे, हलगी, नगारे, पुंगी वाजविली जात जात होती आणि त्या तालावर युवक काठ्या हातात घेऊन नाचत होते.
टोपी व उपरण देऊन पशूपालकांचे स्वागत
सगर महोत्सवात आलेल्या पशूपालकांना मानाची टोपी व उपरणे देऊन स्वागत केले जात होते. प्रत्येक पशूपालकाचे स्वागत माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अशोक सायन्ना यादव, ऋषिकेश जैस्वाल, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार करीत होते. यशस्वीतेसाठी प्रशांत भगत, शाम विभुते, बाळा नामागवळी, अर्जुन पवार, आनंद थट्टेकर, रमेश कोठुळे आदींनी परिश्रम घेतले.