छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालिकांसाठी वाढलेले १० टक्के मतदान फिरविणार निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:30 IST2025-12-04T18:26:23+5:302025-12-04T18:30:02+5:30
मागच्या वेळी ६४ टक्के मतदान, आकडेमोडीच्या राजकारणाचा खल सुरू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालिकांसाठी वाढलेले १० टक्के मतदान फिरविणार निकाल
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी २४८ मतदान केंद्रांवर मंगळवारी सरासरी ७४.७० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत १० टक्के मतदान वाढले असून, हे वाढलेले मतदानच नगर परिषदेतील निकालाचे समीकरण बदलणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आकडेमोडीच्या राजकारणाचा खल सुरू असून, विजयाचे गणित प्रत्येक राजकीय पक्ष लावत आहे. खुलताबाद आणि कन्नडसाठी जास्त मतदान झाले आहे. खुलताबादमधील मतदारांची संख्या सहा नगर परिषदांत सर्वात कमी आहे.
सहा नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी सहा जागांसाठी ३५ तर नगरसेवकपदाच्या १६० जागांसाठी ५६२ उमेदवार रिंगणात होते. या सगळ्याच उमेदवारांनी जास्तीचे मतदान झाल्यामुळे आकडेमोड सुरू केली आहे. उमेदवारांनी प्रचार रणधुमाळीस कमी कालावधी मिळाला. मतदारांच्या गाठीभेटी, निवडणुकीचे नियोजन, रणनीतीवर काम करण्यासही त्यांना वेळ मिळाला नाही. घराघरांत, शेतांवर, विवाह सोहळ्यांमध्ये मतदारांच्या भेटी घेत अनेकांनी प्रचार उरकला. कुठेही महायुती झाली नाही. त्यामुळे प्रचंड टाेकाचा प्रचार या निवडणुकीत पाहायला मिळाला.
शेवटच्या एक तासात २० टक्के वाढ
शेवटच्या एका तासात २० टक्के मतदान वाढले. मोठ्या प्रमाणातील ‘अर्थपूर्ण’ घडामोडीनंतर हे मतदान वाढल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. शहरातील मतदारांपर्यंत अनेक उमेदवारांनी संपर्क करीत त्यांना वाहन व इतर सुविधा पुरविल्या. मतदान करून घेईपर्यंत उमेदवारांची टीम मतदारांच्या संपर्कात होती, अशी चर्चा आहे.
अधिकारी ठेवणार करडी नजर
सहा नगरपालिका निवडणुकीत न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने १७ दिवस ईव्हीएम मशिन सांभाळण्याची जबाबदारी आल्याने प्रशासनाचे ‘टेन्शन’ वाढले आहे. स्ट्राँग रूम केंद्र परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश आहेत. प्रत्येक स्ट्राँग रूमवर करडी नजर ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्याचे नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव यांनी सांगितले.
एकूण मतदार........................किती जणांनी केले मतदान ?
वैजापुरात ४२ हजार ३३४......३१ हजार ०३०
पैठणमध्ये ३७ हजार ८०५......२७ हजार ८७७
सिल्लोड ५४ हजार ८०८........४० हजार ८३६
कन्नडमध्ये ३७ हजार ७८०......२९ हजार ०२७
खुलताबादेत १४ हजार ७७५.....१२ हजार १५४
गंगापुरात २९ हजार २८७........२१ हजार ०१७
एकूण.....२१६७८९...............१ लाख ६१ हजार ९४१