कापड बाजार अडचणीत !
By Admin | Updated: February 2, 2016 00:26 IST2016-02-01T23:54:26+5:302016-02-02T00:26:26+5:30
कळंब : कळंबच्या विकासाचा आर्थिक कणा असलेला कापड व्यापार उद्योग आता शहराबाहेर स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे.

कापड बाजार अडचणीत !
कळंब : कळंबच्या विकासाचा आर्थिक कणा असलेला कापड व्यापार उद्योग आता शहराबाहेर स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. या व्यवसायातील व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या ‘डिमांड’ करण्यात येत असल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होवू लागल्याने हा व्यापार कळंबमध्ये किती काळ टिकतो? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शहरातील कापड व्यापाऱ्याला शेजारील बीड, लातूर, सोलापूर जिल्ह्याबरोबरच दूरवरुन ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. शहरात कापड व्यापार करणारी शंभरच्यावर दुकाने आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब हे आडत, सोने-चांदी व्यापाराबरोबर कापड व्यापारातही महत्वाचे केंद्र बनले आहे. लाखो रुपयाची गुंतवणूक करुन व्यापाऱ्यांनी येथे हे व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे कळंब शहर हे कापडांसाठी ग्राहकांचे ‘हॉट फेवरेट’ ठिकाण ठरले आहे.
या कापड व्यापाराला मात्र मागील काही महिन्यापासून काहींनी टार्गेट करुन त्रास देण्यास सुरुवात केली केल्याचा आरोप होवू लागला आहे़ काही तांत्रिक बाजूंना मुद्दा करुन व्यापारी वर्गाला थेट ब्लॅकमेल करण्याचे उद्योगच आता शहरात सुरु झाल्याची चर्चा आहे. या व्यापाऱ्यांनी डिमांड पूर्ण केली नाही तर त्यांच्या बदनामीचे षडयंत्रही रचले जात असल्याने सध्या शहरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शहरात पूर्वी कधीही अनुभवली नाही एवढी अस्वस्थता सध्या अनुभवली जात असल्याचे अनेक व्यापारी सांगत आहेत़ (वार्ताहर)
कळंबचा कापड व्यवसाय इतरत्र स्थलांतरीत झाल्यास शहर व परिसरातील हजारो कुशल-अकुशल कामगारांना फटका बसू शकतो. या व्यवसायावर सध्या ४ ते ५ हजार जणांचा उदरनिर्वाह चालतो आहे. या कुटुंबातही यामुळे रोजगारास मुकावे लागणार आहे. कापड व्यवसायामुळे इतरही छोट्या-मोठ्या व्यवसायांना फायदा होतो, त्यांनाही हे स्थलांतर परवडणारे नाही़ असे झाले तर जवळपास पाच हजार कामगारांना याचा फटका बसणार आहे़
व्यापार थंड पण ‘डिमांड’ वाढली!
४शहरातील व्यापारालाही सध्या दुष्काळाचा फटका बसतो आहे. फारशी आर्थिक उलाढाल नसल्याने व्यापारी मंदीचा अनुभव घेत असताना शहरातील काही जणांनी व्यापाऱ्यांकडून भलत्याच ‘डिमांड’ची अपेक्षा ठेवल्याचे सांगितले जात आहे. यासाठी विविध तांत्रिक बाबींचाही आधार घेतला जातो आहे. शहरात इतर प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असताना व्यापाऱ्यांनाच नियमांची फुटपट्टी लावून हा त्रास दिला जात असल्याची चर्चाही सध्या व्यापाऱ्यांमध्ये आहे.