छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकवस्तीमधील भंगार दुकानांना आगीच्या घटनांनी टेन्शन वाढलं
By मुजीब देवणीकर | Updated: March 10, 2025 15:00 IST2025-03-10T14:54:57+5:302025-03-10T15:00:02+5:30
व्यापाऱ्यांनी स्वत:हून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्यास या भागातील अनधिकृत भंगार-वखार गोदामांवर बुलडोझर चालणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकवस्तीमधील भंगार दुकानांना आगीच्या घटनांनी टेन्शन वाढलं
छत्रपती संभाजीनगर : नारेगाव भागात भंगार आणि वखार गोदामांचे मोठे हब तयार झाले. लघु उद्योग म्हणून ही समाधानाची बाब असली, तरी अलीकडे येथे आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. आसपास लोकवसाहत असल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे टेन्शन वाढू लागले. व्यापाऱ्यांनी स्वत:हून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्यास या भागातील अनधिकृत भंगार-वखार गोदामांवर बुलडोझर चालविण्याशिवाय मनपाकडे पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात किमान ३०० पेक्षा अधिक भंगाराची दुकाने, गोडावून आहेत. २०० पर्यंत वखार, फर्निचर उद्योगाची लहान मोठी दुकाने आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी या दुकानांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भंगार, फर्निचर तयार करणाऱ्या गोदामांना आग लागत आहे. विशेष बाब म्हणजे या घटना रात्रीच होतात. संबधित व्यावसायिकांकडे आग लागल्यानंतर प्राथमिक उपाययोजना सुद्धा नसतात. त्यामुळे आग पाहता-पाहता रौद्र रूप धारण करते. ही गोदामे नारेगाव भागात अशा ठिकणी आहेत, जेथे अग्निशमन बंब सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. नारेगाव येथेच भंगार आणि फर्निचरची जवळपास दीडशेपेक्षा अधिक गोदामे आहेत. उन्हाळ्यात शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणत्या कारणाने दुकान, गोदामांना हमखास आग लागत असते. आजूबाजूला दाट नागरी वसाहती आहेत. आगीची झळ सर्वसामान्यांना बसली, तर मोठा अनर्थ होईल, असे अग्निशमन विभागाला वाटू लागले. संबंधित व्यापाऱ्यांनी स्वत:हून उपाययोजना न केल्यास मनपाला कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे.
नोटीस देणार
शहरात आणि विशेषत: नारेगाव भागात भंगार, वखारचे गोदाम वाढले आहेत. येथे सतत आगीच्या घटना घडत असतात. संबधित व्यापाऱ्यांना अग्निशमन विभागाकडून नोटिसा देण्यात येणार आहेत. आसपास नागरी वसाहत असल्याचे येथे मोठा धोका आहे. नागरी वसाहतीत भंगार, वखार, फर्निचर व्यवसाय नको.
संपत भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा
चिखली कुदळवाडीची पुनरावृत्ती होईल
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी चिखली कुदळवाडी भागात २७६ एकर जमिनीवर ५११ लघु उघोगांवर बुलडोझर फिरविला होता. कोणतीही परवानगी व सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते. त्यामुळे मनपाने कारवाईचा बडगा उगारला होता. याची पुनरावृत्ती नारेगाव भागात होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.