छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा यात्रेचे टेंडर पहिल्यांदाच एक कोटीत, ११ दिवसांसाठी भाडे
By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 16, 2025 15:20 IST2025-09-16T15:09:45+5:302025-09-16T15:20:49+5:30
कर्णपुऱ्यातील ५ ते ६ एकर परिसरात नवरात्रौत्सवाचे ११ दिवस देवीची यात्रा भरविण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा यात्रेचे टेंडर पहिल्यांदाच एक कोटीत, ११ दिवसांसाठी भाडे
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रौत्सवानिमित्त कर्णपुरा देवीची यात्रा भरविण्याची परंपरा सुमारे शतकाची आहे. या यात्रेत दररोज लाखो भाविक कुटुंबासह देवीचे दर्शन घेतात व यात्रेतील मनोरंजनाचा आनंदही घेतात. यात्रा व पार्किंगचे एकत्रित टेंडर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच जीएसटीसह टेंडरने एक कोटीच्या आकड्याला स्पर्श केला आहे.
छावणीच्या तिजोरीत जमा होणार ८५ लाख
कर्णपुऱ्यातील ५ ते ६ एकर परिसरात नवरात्रौत्सवाचे ११ दिवस देवीची यात्रा भरविण्यात येणार आहे. येथे पूजेच्या साहित्यापासून ते आकाशपाळण्यापर्यंत असे सुमारे ८०० ते १ हजार लहान-मोठे व्यावसायिक सहभागी होतात. छावणी परिषदेअंतर्गत हा परिसर येतो. येथे भरविण्यात येणारी यात्रा व पार्किंगचे दरवर्षी टेंडर काढले जाते. यंदा दोन्ही टेंडर एकत्रित करून ८४ लाख ५१ हजार रुपयांचे टेंडर आहे. ही रक्कम छावणी परिषदेच्या तिजोरीत जमा होईल. त्यावर १८ टक्के जीएसटी १५ लाख २१ हजार १८० रुपये ही रक्कम केंद्रसरकारच्या तिजोरीत जमा होईल. असे एकूण ९९ लाख ७२ हजार रुपये टेंडर घेणाऱ्यांना भरावे लागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील वर्षीपेक्षा टेंडर आठ लाख जास्त
मागील वर्षी टेंडरपोटी छावणी परिषदेला ७६ लाख २५ हजार रुपये मिळाले होते. यंदा टेंडरद्वारे ८४ लाख ५१ हजार रुपये मिळणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा छावणी परिषदेला ७ लाख ७४ हजार रुपये प्राप्त होणार आहे.