प्रवेश रद्द करण्यासाठी दहा हजारांची लाच
By Admin | Updated: June 9, 2014 00:09 IST2014-06-08T23:43:41+5:302014-06-09T00:09:42+5:30
उस्मानाबाद : प्रवेश रद्द केल्यानंतर १२ वीची सनद व जातीचे प्रमाणपत्र परत देण्यासाठी संस्थाचालकाच्या सूचनेवरून दहा हजाराची लाच घेणाऱ्या महिला ट्यूटरला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़

प्रवेश रद्द करण्यासाठी दहा हजारांची लाच
उस्मानाबाद : नर्सिंग महाविद्यालयातील प्रवेश रद्द केल्यानंतर १२ वीची सनद व जातीचे प्रमाणपत्र परत देण्यासाठी संस्थाचालकाच्या सूचनेवरून दहा हजाराची लाच घेणाऱ्या महिला ट्यूटरला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून, या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील गालिबनगर येथील साई नर्सिंग स्कूलमध्ये एका विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष २०१२-१३ साठी प्रवेश घेतेवेळी तेथील ट्यूटर नीलम शेख यांची भेट घेतली़ त्यावेळी प्रवेशासाठी मूळ जातीचे प्रमाणपत्र, १२ वीची सनद संस्थेकडे जमा करण्यास सांगून दोन वर्षाची पाच हजार रूपये फीस भरावी लागेल, असे सांगितले़ तक्रारदार हिने प्रवेश रद्द करण्याबाबत विचारणा केल्यानंतर निलम शेख यांनी अर्ज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे परत देण्यात येतील, प्रवेश रद्द करण्यास अडचण येणार नाही, असे सांगितले होते़ त्यानंतर काही कारणामुळे तक्रारदार विद्यार्थीनीने प्रवेश रद्द करावा लागल्याने मूळ जातीचे प्रमाणपत्र व १२ वी ची सनदची मागणी केली़ त्यावेळी संस्थाचालक मनोहर बदामे यांनी तक्रारदारास २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रूपये ट्यूटर नीलम शेख यांच्याकडे द्या, असे सांगितले़ यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक पिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील पथकाने शनिवारी रात्री नर्सिंग स्कूलमध्ये सापळा रचला़ त्यावेळी संस्थाचालक मनोहर रामचंद्र बदामे (रा़इंडिया नगर लातूर) यांच्या सांगण्यावरून ट्यूटर निलम लतिफ शेख (रा़बार्शी) यांनी दहा हजाराची लाच स्विकारतास जेरबंद करण्यात आले़ या प्रकरणाचा अधिक तपास प्रभारी पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (प्रतिनिधी)