बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:30 IST2025-05-20T14:27:15+5:302025-05-20T14:30:03+5:30

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात.

Ten flying squads of the Agriculture Department in Chhatrapati Sambhajinagar district to take action against bogus seed and fertilizer sellers | बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते आणि बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय एक आणि ९ तालुक्यांत प्रत्येकी एक, अशा १० भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. बोगस माल जप्त करणे आणि संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविणे, अथवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत.

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात. एवढेच नव्हे तर परवानाधारक दुकानदार शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खत आणि बियाणे विक्री करण्यासाठी अन्य माल घेण्याची सक्ती करतात. अशाप्रकारे लिंकिंग करून शेतकऱ्यांना लुबाडले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रकाश पाटील या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकात वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी पी. ए. ताजने, वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक एस. वाय. मुंढे सदस्य आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एच. एस. कातोरे पथकाचे सचिव आहेत.

प्रत्येक भरारी पथकात पाच अधिकारी
तालुकास्तरीय भरारी पथकात पाच अधिकारी आहेत. यात तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असतील तर जि. प. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक हे सदस्य आहेत. पंचायत समिती कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत.-

थेट तक्रार करा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बनावट बियाणे आणि खतांविषयी माहिती मिळाल्यास तातडीने भरारी पथकांशी संपर्क साधावा, अथवा थेट आमच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी.
.-प्रकाश देशमुख, कृषी अधीक्षक

तालुकास्तरावर कृषीचे तक्रार निवारण कक्ष
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खतांच्या बाबतीत काही तक्रार करायची असेल तर त्यांना सहज तक्रार करता यावी, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नऊ कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती कृषी - अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली.

Web Title: Ten flying squads of the Agriculture Department in Chhatrapati Sambhajinagar district to take action against bogus seed and fertilizer sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.