तंत्रमंत्र सम्राट फेम भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात; समस्या निवारणाच्या नावे अनेकांना लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 12:43 IST2021-08-21T12:34:07+5:302021-08-21T12:43:55+5:30
Bhondubaba in police custody : महसूल प्रबोधनी समोरील गौतमनगर येथील लक्ष्मी टॉवरच्या गाळा क्र. ३ मध्ये बस्तान बसवले होते

तंत्रमंत्र सम्राट फेम भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात; समस्या निवारणाच्या नावे अनेकांना लुबाडले
औरंगाबाद : महसूल प्रबोधनीच्या समोरील इमारतीमध्ये दुकान थाटून चार, पाच आणि दहा हजार रुपये घेऊन जादूटोणा करून उपचार करणारा उत्तर प्रदेशातील भोंदूबाबा क्रांती चौक पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ( Tantramantra Samrat fame Bhondubaba in police custody; Many were robbed in the name of problem solving)
क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक दराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महसूल प्रबोधनी समोरील गौतमनगर येथील लक्ष्मी टॉवरच्या गाळा क्र. ३ मध्ये एक तंत्रमंत्र सम्राट मिया मुसाजी नावाने एक बाबा वशीकरण, मूठ करणी, शत्रुनास, सैतान प्रॉब्लेम, व्यसनमुक्ती, कोर्ट केस, घटस्फोट, सासू-सुनाचे भांडण, संतान समस्या, प्रॉपर्टी विवाद यावर उपचार करण्याच्या बहाण्याने बस्तान थाटले होते. तो जादूटोणा करून नागरिकांची लुबाडणूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीनुसार निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक संतोष राऊत, महादेव गायकवाड, सहाय्यक फाैजदार नसीम खान, हवालदार मंगेश पवार, नरेंद्र गुजर, अनंत कुलकर्णी, कृष्णा चौधरी यांनी घटनास्थळी छापा मारला. यामध्ये तंत्रमंत्र सम्राट मोहम्मद नईम मलीक मोहम्मद यामीन (४०) आणि शहजाद अन्सारी निरास अन्सारी (२६, रा. ग्राम इंचोली, जि. मेरठ, उत्तर प्रदेश) हे दोघे आढळून आले. भोंदूबाबाकडे विचारपूस केली असता, त्याने माहितीसाठी आलेल्या व्यक्तीकडून तपासणी शुल्क २५० रुपये घेताे. तसेच त्यांना उपचारासाठी बोलावल्यानंतर ४, ५ आणि १० हजार रुपये घेत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आल्यामुळे दोघांना ताब्यात घेतले. निरीक्षक डॉ. दराडे यांच्या तक्रारीवरून जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे साहित्य केले जप्त
क्रांती चौक पोलिसांनी भोंदूबाबाच्या समोर छोट्या टेबलवर ठेवलेले लिंबू, अगरबत्ती, फुले, टाचण्या, दोरा, बंडल, ताट, चिल्लर पैसे, चाकू, प्लॅस्टिक बरण्यामध्ये जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य सापडले आहे. याशिवाय त्याने भिंतीवर साईबाबांचे मोठे पोस्टर चिकटविलेले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.