बोलक्या सतारीने साधला ‘शब्देविन संवादू!’
By Admin | Updated: December 21, 2014 00:18 IST2014-12-21T00:07:08+5:302014-12-21T00:18:04+5:30
औरंगाबाद : उत्कट, तीव्र, स्निग्ध, कोमल अशा अनेक भावांचा सहजाविष्कार करीत उस्ताद शुजात खान यांच्या बोलक्या सतारीने शनिवारी अवघा आसमंत भारून टाकला.

बोलक्या सतारीने साधला ‘शब्देविन संवादू!’
औरंगाबाद : उत्कट, तीव्र, स्निग्ध, कोमल अशा अनेक भावांचा सहजाविष्कार करीत उस्ताद शुजात खान यांच्या बोलक्या सतारीने शनिवारी अवघा आसमंत भारून टाकला.
गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उस्ताद विलायत खान यांचे नातू शुजात खान यांच्या सतारस्वरांमधून रसिकांना अक्षरश: ‘शब्देविन संवादू’चा प्रत्यय आला. यासह स.भु.चे माजी विद्यार्थी व ग्वाल्हेर घराण्याचे तरुण गायक संदीप देशमुख यांनीही तळपत्या गायकीचे दर्शन घडविले. घराण्याची सात पिढ्यांची समृद्ध परंपरा जपतानाच त्यांनी गायकी अंगाने जाणारी सतार हे वैशिष्ट्य जपले आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी शुजात खान यांचा सत्कार केला. प्रेषित रुद्रवार यांनी निवेदन केले.
पूर्वार्धात देशमुख यांनी मारवा रागाने मैफलीचा आरंभ केला. विलंबित एकतालातील ‘शिव के सुमिरण’ व ‘प्रभू मोरे अवगुण चित ना धरो’ ही अध्धा तीनतालातील बंदिश त्यांनी नजाकतीने पेश केली. यानंतर एक तराणा घेत रूपक तालातील तिलक कमोद रागातील बंदिश गायली. शेवटी गायलेले ‘वैष्णव जन तो तेणे कहिये...’ हे भजन त्यांनी गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृतीला अर्पण केले. श्रीकांत भावे, प्रवीण कासलीकर, चैतन्य जोगाईकर व कुलभूषण कहाळेकर यांनी साथ केली.
तंतुवाद्याची अंगभूत मर्यादा ओलांडत शुजात खान यांच्या गाणाऱ्या सतारीने श्रोत्यांच्या काळजाच्याही तारा छेडल्या. सुरुवातीस त्यांनी राग यमन साकारला. आलाप, जोड, झाला अशी बढत करीत विलंबित तीन तालमधील बंदिश त्यांनी सादर केली. संगीताच्या जाणकारांसह स्वरांचे व्याकरण न कळणाऱ्या सामान्यांनाही दिव्यत्वाची प्रचीती दिली. पं. भीमसेनजी आणि उस्ताद आमीरखाँ यांचे कृतज्ञ स्मरण करीत त्यांनी आपल्या गुरूंच्या आठवणींनाही उजाळा दिला. अलौकिक स्वरानुभूतीत रसिक तल्लीन झालेले असताना अवचित एका क्षणी उस्ताद शुजात खान यांनी ‘दर्शन देवो शंकर महादेव’ ही मध्य लय तीन तालमधील बंदिश छेडली. केवळ धृपद आणि अंतरा गात खर्जातल्या आवाजाने स्वरगाभारा उजळून टाकला. निर्गुण निराकाराचे अस्तित्वाच यातून खान यांनी दर्शविले. तबल्यावर साथ करणाऱ्या पं. मुकेश जाधव व खान यांच्या जुगलबंदीनेही दोन वाद्यांचे अद्भुत द्वैत साकारले. परस्परांचा तेजोभंग न करताही स्वतंत्र अस्तित्वाची झलक दाखवून या दोन कलावंतांनी भरभरून दाद मिळवली.