तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 20:01 IST2024-10-14T20:01:15+5:302024-10-14T20:01:30+5:30
तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू

तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा
छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्यात तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये संशय कल्लाेळाच्या चर्चेने जिल्हा प्रशासन ढवळून निघाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तलाठ्यांची आस्थापना देण्याच्या शासन निर्णयाला हरताळ फासत बंदल्यांमध्ये ‘लिलाव’ झाल्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. असे असताना दोन महिन्यांपासून काही तलाठ्यांनी प्रशासनाच्या बदल्यांच्या आदेशाला ठेंगा दाखविला आहे. बदलीचे आदेश निघूनही अनेकांनी सध्या सज्जा सोडलेला नाही. परिणामी, ज्यांची बदली झाली ते दुसरीकडे रुजू झाले, तर ज्यांना मर्जीतील ठिकाण मिळाले नाही, म्हणून ते आहे त्याच ठिकाणी आहेत. यात सामान्य नागरिकांची होरपळ होत आहे.
जिल्ह्यातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना समुपदेशन अभिलेख तपासण्याचे आदेश दिले. त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
तलाठ्यांच्या बदल्यानंतर महसूल सहायक आणि अव्वल कारकून यांच्याही बदल्या झाल्या. त्यातीलही अनेकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास चालढकल केल्यानंतर प्रशासनाने एकतर्फी कार्यमुक्तीचे आदेश काढले. मग तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान बदल्या केलेल्यांपैकी १०१ तलाठी रुजू झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
प्रशासकीय बाजू अशी
महसूल सहायक, अव्वल कारकुनांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील अनेक जण रुजू झाले नाहीत, हे कळाल्यानंतर त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेश ४ ऑक्टोबर रोजी काढले. त्यांना आता बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावेच लागेल. अन्यथा ते सध्या जिथे कार्यरत आहेत, त्या आस्थापनेवरून त्यांचे वेतन निघणार नाही. असाच निर्णय तलाठ्यांच्या बाबतीत माहिती घेऊन होईल.
-विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी
बदली करण्यात आलेले तलाठी - १११
महसूल सहायक : ५१
अव्वल कारकून : २४
मंडळ अधिकारी : ७