तांदूळवाडी सज्जाचा तलाठी चतुर्भूज
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:48:35+5:302014-12-04T00:53:01+5:30
वाशी : खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देण्यासाठी खाजगी लेखनीकामार्फत एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या

तांदूळवाडी सज्जाचा तलाठी चतुर्भूज
वाशी : खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देण्यासाठी खाजगी लेखनीकामार्फत एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहात अटक केली. तालुक्यातील तांदूळवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत एसीबी विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदाराने त्यांच्या भावाकडून जवळका शिवारातील शेतजमीन खरेदीखत करून घेतल्यानंतर ४ जानेवारी २०१३ रोजी त्यांनी फेरफारच्या कमासाठी सर्व कागदपत्रे तांदूळवाडी सज्जाचे तलाठी राजाभाऊ दगडू कुंभार यांच्याकडे दिले होते. यानंतर तक्रारदार हे फेरफारच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी कुंभार याच्याकडे गेले असता कुंभार यांनी फेरफारची कागदपत्रे पहावी लागतील, कागदपत्रांची फाईल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागेल, फेरफार मंजूर करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून एक हजार रुपयांची मागणी केली. यानंतरही तक्रारदारांनी वारंवार कुंभार यांच्याकडे कामाबाबत चकरा मारल्या. मात्र, कुंभार यांनी ‘एक हजार रूपये आणून दे, तुझे फेरफारचे काम करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देतो. नाहीतर तुला कुठे जायचे तिकडे जा’, असे सांगितले. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून एसीबीचे पोलस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बुधवारी तांदूळवाडी येथे सापळा रचला. यावेळी तलाठी कुंभार याने तक्रारदाराकडे एक हजार रूपये लाचेची मागणी करून खाजगी लेखनिक विलास चौधरी याच्यामार्फत ती स्वीकारल्यानंतर रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी तलाठ्यासह लेखनिकावरही लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)