मोर्चा काढून निराधारांचा तहसीलसमोर ठिय्या
By Admin | Updated: July 22, 2014 00:14 IST2014-07-22T00:05:28+5:302014-07-22T00:14:02+5:30
अंबाजोगाई: विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निराधारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मोर्चा काढून निराधारांचा तहसीलसमोर ठिय्या
अंबाजोगाई: २०१० पासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांच्या लाभार्थ्यांचे रखडलेले अर्ज तात्काळ मंजूर करा, ग्रामीण भागातील विधवा महिलांना अन्न सुरक्षा लागू करा, यासारख्या विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निराधारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी नाही. हे रखडलेले काम मार्गी लावा, विधवा महिलांना अन्न सुरक्षा योजना लागू करा, रमजान महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना धान्याचे वाटप करावे, तहसील कार्यालयात एपीएल व बीपीएल कार्ड काढण्यासाठी पाचशे ते सहाशे रूपयांची मागणी केली जाते, त्यांचा बंदोबस्त करावा, यासारख्या विविध प्रमुख मागण्यांना घेऊन निराधार महिलांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
शहरातून निघालेल्या मोर्चात निराधार महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातून मोर्चा काढल्यानंतर निराधार महिलांनी तहसील कार्यालयासमोर येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य करा अन्यथा खुर्ची खाली करा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या..., देत कशा नाहीत, दिल्याच पाहिजेत, यासाख्या विविध घोषणा देऊन महिलांनी आपला संताप व्यक्त केला. मानवलोक कार्यालयाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात डॉ. द्वारकादास लोहिया, बाबा जोशी, शाम सरवदे, संजना आपेट यांच्यासह निराधार महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू, या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे अश्वासन आ.पृथ्वीराज साठे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आ. साठे यांनी निराधारांच्या आंदोलनात सहभागी होऊन मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे दिले. यावेळी आ.साठे, डॉ.लोहिया आदींची उपस्थिती होती.
अर्ज निकाली काढण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
निवडणूक आचारसंहितेमुळे समितीची बैठक न झाल्याने अर्जाची मंजुरी रखडली होती. अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू असून लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा होईल. यासाठी मंजुरी मिळालेल्या लाभार्थींनी बँक पासबुकांची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी केले आहे.
(वार्ताहर)