गारपीट तक्रारींची दखल घ्या
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-13T23:39:59+5:302014-07-14T00:59:28+5:30
परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़

गारपीट तक्रारींची दखल घ्या
परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, रोहयो, पाणीटंचाई व विकासकामांची आढावा बैठक १० जुलै रोजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ एस़ डुंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती़ या गारपिटीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही़ या तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील आदेश दिले़ तसेच सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत शिबिरे घेऊन या कार्यक्रमास गती द्यावी, समाधान योजनेंतर्गत ग्रामस्थांना लाभ द्यावा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन ग्रामसभा घ्याव्यात व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्यांचे निराकरण करावे, मतदान केंद्र व मतदान यादी बाबतच्या स्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या़ (प्रतिनिधी)
टंचाईचे आराखडे तयार ठेवा
यावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यामुळे पाऊस लांबला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ अशी स्थिती निर्माण झाल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी टंचाई आराखडे तयार ठेवावेत़ टंचाई उद्भवेल अशा गावांमध्ये रोहयो कामांचे प्राधान्याने नियोजन करावे, रोहयोचे प्रलंबित हजेरीपट त्वरित तयार करावे, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले़ दरम्यान, ९ जुलैअखेर ६८़४१ मिमी पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात टँकर सुरू नाहीत़ टंचाई उद्भवू शकणाऱ्या गावे व तांड्यांसाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, पाणीटंचाई भासू नये, यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़