सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: March 23, 2016 00:20 IST2016-03-23T00:17:44+5:302016-03-23T00:20:02+5:30
नांदेड : हॉटेल व्यावसायिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर शैलजा स्वामी यांनी मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या आढावा बैठकीत दिले़

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा
नांदेड : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर शैलजा स्वामी यांनी मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या आढावा बैठकीत दिले़ त्याचवेळी शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याबाबतही निर्देश देण्यात आले़
शहरातील वाढती अस्वच्छता आणि वाढते अतिक्रमण पाहता महापालिकेकडून मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मंगळवारी महापौर शैलजा स्वामी यांनी क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची महापालिकेत बैठक घेतली़ उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचीही प्रमुख उपस्थिती होती़ शहरात अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांकडून सार्वजनिक ठिकाणीच हॉटेलमधील वेस्टेज टाकले जात आहे़
याचा परिणाम त्या त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे़ असे असतानाही महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवूनच असल्याचे दिसत आहे़ ही बाब निदर्शनात आणून देताना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले़ शहरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे़ त्यात दुकानदारांसह किरकोळ व्यापाऱ्यांचाही समावेश आहे़ मुख्य रस्ते मोकळे करण्यासाठी आता मोहिमेची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले़ मोकाट जनावरांचाही शहरातील नागरिक व वाहतुकीला फटका बसत आहे़ शहरात अनेक भागात मोकळ्यावरच मांसविक्री होत आहे़ याकडेही त्यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे लक्ष देताना संबंधितांविरूद्ध कारवाई का करण्यात येत नसल्याचा सवाल त्यांनी केला़
शहरात बहुतांश ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्सद्वारे होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी जी ठिकाणी महापालिकेने बॅनर्ससाठी निश्चित करण्यात आली आहेत तेथेच परवानगी द्यावी, अन्य ठिकाणी बॅनर्स लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले़(प्रतिनिधी)