‘त्या’ उड्डाणपुलाच्या कंत्राटदारावर कारवाई करा
By Admin | Updated: July 6, 2016 23:54 IST2016-07-06T23:50:09+5:302016-07-06T23:54:45+5:30
महावीर चौकातील उड्डाणपुलाला ५ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे लागलेल्या गळतीचे प्रकरण व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गांभीर्याने घेतले

‘त्या’ उड्डाणपुलाच्या कंत्राटदारावर कारवाई करा
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २० जून रोजी वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या महावीर चौकातील उड्डाणपुलाला ५ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे लागलेल्या गळतीचे प्रकरण व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गांभीर्याने घेतले आहे. पुलाला गळती लागणे ही योग्य बाब नसून याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा, असे आदेश त्यांनी स्थानिक पातळीवर दिले आहेत. दरम्यान, उपअभियंता उदय भरडे व टीमने त्या पुलाची तातडीने पाहणी करून पुलाच्या तांत्रिक बाबींचा अहवाल तयार केला. पुलाच्या गळतीचे नेमके कारण काय? याची माहिती व्यवस्थापकीय संचालकांना सांगण्यात आल्याचे भरडे यांनी सांगितले. ६ जुलैच्या अंकामध्ये लोकमतने पुलाला गळती लागल्याचे वृत्त प्रकाशित केले. रस्ते विकास महामंडळाच्या स्थानिक कार्यालयापासून मुंबईपर्यंतच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. काल शहरात झालेल्या ६६.५ मि.मी. पावसाने महावीर चौकातील पुलाला गळती लागली. पुलाच्या पहिल्या पिलर (कॉलम) पासून दुसऱ्या पिलरपर्यंतचे अंतर ५० मीटरपर्यंत आहे. महावीर स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचा पिलर हा २५ मीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुलावरील काँक्र ीटचा ट्रान्सपोर्ट पॅसेज मोठा आहे.
पुलाला धोका होणार नाही
पुलाच्या काँक्र ीटमधील लोखंडावर गळतीमुळे परिणाम होऊ शकतो का? यावर एमएसआरडीसीचे उपअभियंता उदय भरडे म्हणाले, दुभाजकामध्ये २५ एमएमचा गॅप आहे. ५० मीटरपर्यंत स्लॅबचे अंतर आहे.
पुलावर पाणी साचत असून ते जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी लागेल. पुलावर गळतीमुळे काहीही परिणाम अथवा धोका होणार नाही. तसेच दोन्ही बाजूंचे स्लॅब बेअरिंगवर आहेत. तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न करून गळती थांबविण्यात येईल.
तज्ज्ञांचे मत...
उन्हाळ्यात काँक्रीट तापते त्यामुळे स्लॅब प्रसरण पावतो, तर पावसाळा अथवा हिवाळ्यात स्लॅब कमी तापमानामुळे आकुंचन पावतो. त्यामुळे दोन्ही स्लॅबमध्ये गॅप ठेवावा लागतो. गळतीमुळे स्लॅबच्या काँक्रीटवर परिणाम होत नाही. गळती जर स्लॅबच्या गॅपमधून होत असेल पुलाला काहीही धोका नाही आणि जर गळती स्लॅबला असेल तर दुरुस्त करावी लागेल, असे मत स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञाने नाव सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.