वराहपालन करणाऱ्या हेळंबच्या ‘त्या’ युवकाचा खून !
By Admin | Updated: July 27, 2014 01:13 IST2014-07-26T23:57:11+5:302014-07-27T01:13:24+5:30
वाढवणा (बु़) : वराह पालन व्यवसाय कामासाठी नात्यामधील एकाकडे असलेल्या एका युवकाचा गेल्या महिन्यात खून झाला होता़ याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली

वराहपालन करणाऱ्या हेळंबच्या ‘त्या’ युवकाचा खून !
वाढवणा (बु़) : वराह पालन व्यवसाय कामासाठी नात्यामधील एकाकडे असलेल्या एका युवकाचा गेल्या महिन्यात खून झाला होता़ याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असता आरोपींनी युवकाचा झोपेत खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे़ कुठलाही संशय येऊ नये म्हणून युवकाचा मृतदेह कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात फेकून दिल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे़ या तीनही आरोपी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत़
उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु़) पोलिसांच्या माहितीनुसार, डोंगरशेळकी येथील परमेश्वर रामचंद्र बिजराळे यांचा वराह पालनाचा व्यवसाय आहे़ त्याने मदतीसाठी हेळंब येथील शिवाजी जाधव (१९) यास कामावर ठेवले़ शिवाजी जाधव हा डोंगरशेळकी येथे तर त्याची आई शांताबाई जाधव ह्या गावी राहत होत्या़ तो नेहमी मोबाईलवरुन आईशी संवाद साधत असे़ परंतु, गेल्या १५ दिवसांपासून मुलगा मला बोलला नाही म्हणून त्यांनी ३ जुलै रोजी डोंगरशेळकी येथे येऊन परमेश्वर बिजराळे याच्याकडे मुलाची चौकशी केली़ तेव्हा बिजराळे याने शिवाजी हा १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले़ त्यामुळे त्याच्या आईने वाढवणा पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली़ दरम्यान, पुन्हा शांताबाई जाधव यांनी २० जुलै रोजी वाढवणा पोलिसांत आपल्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद दिली़ त्यानुसार पोलिसांनी डोंगरशेळकी येथील परमेश्वर बिजराळे, रमेश माने, नरसाबाई बिजराळे व उज्वलाबाई बिजराळे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला़
यातील परमेश्वर बिजराळे, रमेश माने आणि नरसाबाई बिजराळे यांना २१ जुलै रोजी अटक केली़ न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलिस कोठडी देण्यात आली़ तेव्हा परमेश्वर बिजराळे याने शिवाजी जाधव याचा १४ जून रोजी डोंगरशेळकी येथे झोपलेल्या ठिकाणी खून केला असल्याचे सांगितले़ संशय येऊ नये म्हणून रमेश माने यांच्या मदतीने चारचाकी वाहनातून (एमएच २४, व्ही ६८७४) १५ जून रोजी घटनास्थळापासून २५० ते ३०० कि़मी़अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील एका निर्जनस्थळी टाकल्याचे सांगितले़ दरम्यान, गुलबर्गा जिल्ह्यातील निलोगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ जून रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला़ कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले़(वार्ताहर)
चौथा आरोपी फराऱ़़
या प्रकरणातील उज्ज्वलाबाई बिजराळे ही चौथा आरोपी असलेली महिला अद्यापही फरार आहे़ तिचा शोध घेण्यात येत असल्याचे सपोनि लक्ष्मणराव राख यांनी सांगितले़ तब्बल दीड महिन्याने या घटनेचा तपास लागला आहे़