ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:35 IST2025-07-08T12:34:29+5:302025-07-08T12:35:34+5:30
स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.

ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न
छत्रपती संभाजीनगर : उपचारासाठी रुग्णाला दाखल करताना घाटीत नातेवाइकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियागृहातून रुग्णाला वाॅर्डात नेताना नातेवाइकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागत आहे. स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.
घाटीत रात्रीच्या वेळी नातेवाइकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागत असल्याबाबत आणि स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेसंदर्भातील व्हिडीओ शनिवारी सामाजिक माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यात महिला, पुरुष नातेवाईक रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वाॅर्डात घेऊन जात असल्याचे दिसते. घाटीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतरही संबंधित रुग्णाला वॉर्डात नेण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे अनेक वाॅर्डांतील स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे. त्याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने लक्ष द्यावे
वाॅर्ड क्र. १२ मधील स्वच्छतागृहातील फरशा तुटलेल्या आहेत. त्यातच पाणीही साचले आहे. त्यामुळे तेथून ये-जा करणेही अशक्य होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला नातेवाइकांनाच स्ट्रेचरवरून वाॅर्डात घेऊन जावे लागते. ही जबाबदारी रुग्णालयातील मामा, मावशी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी पार पाडली पाहिजे.
- रेखा आढाव, रुग्णाचे नातेवाईक
बांधकाम विभागाला सूचना
स्वच्छतागृहासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. सा. बां. विभाग त्यावर काम करत आहे. वॉर्डातील कर्मचाऱ्यांना दररोज स्वच्छता करण्याची सूचना केली आहे.
- डाॅ. गायत्री तडवळकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी