सुरेश केतकर यांचे जीवन संघासाठीच समर्पित
By Admin | Updated: July 24, 2016 00:46 IST2016-07-24T00:38:15+5:302016-07-24T00:46:05+5:30
लातूर : सुरेश केतकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले़ त्यांच्यामुळे संघाची चळवळ गावागावांत पोहोचली़ आत्मीयतेच्या जोरावर कार्यकर्त्यांना

सुरेश केतकर यांचे जीवन संघासाठीच समर्पित
लातूर : सुरेश केतकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले़ त्यांच्यामुळे संघाची चळवळ गावागावांत पोहोचली़ आत्मीयतेच्या जोरावर कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचे काम त्यांनी केले़ त्यांचे अनुकरण करून संघाचे काम वाढविणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे शनिवारी केले़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेश केतकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन दयानंद सभागृहात करण्यात आले होते़ प्रारंभी सुरेश केतकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, गंगाधर पवार, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, व्यंकटसिंह चौहाण, दादा पवार, डॉ़ विलास केतकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी सरसंघचालक भागवत म्हणाले, स्वयंसेवक घडविण्यासाठी आपण अंगिकारलेले तत्त्व वास्तवात उतरविले पाहिजेत़ आपले निर्णय ठामपणे घेतल्यास त्याच दमाचे कार्यकर्ते तयार होतील़ त्यासाठी स्वत: सुरेश केतकर अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने वागत होते़
(अधिक वृत्त हॅलो २ वर)
संघ म्हणजे प्रेम़ आपल्या वर्तनातून चांगल्या गोष्टी सांगून डॉ़ हेडगेवार यांनी सुरू केलेले कार्य अखंडपणे चालू ठेवण्याचे काम त्यांनी केले़ तन, मन, धन पूर्वक समर्पित जीवन ते संघासाठी जगले़ लाटांचा समुद्र नसतो़ समुद्राची लाट असते़ संघाची ही पाचवी पिढी आहे़ प्रत्येकवेळी केवळ नाव बदलते़ संघाचे विचार कार्य कायम आहेत़ संघात कोण कधी कुठल्या पदावर जाईल, याचा नेम नसतो़ आपल्या कल्पनेतील भारत उभारेपर्यंत या विचारांची साथ संघ सोडणार नाही, असेही भागवत म्हणाले़ सुरेश केतकर यांच्या स्नुषा पूजा केतकर म्हणाल्या, सुरेश केतकर यांनी संघावर जीवनभर प्रेम केले़ त्यांनी कुटुंबाकडे वळून पाहिले नाही़ आईचे निधन झाले असताना ते पटणा येथे होते़ पूर्वनियोजित दौरा असल्याने ते अंत्यसंस्काराला आले नाहीत़ संघाची शिस्त त्यांनी कधीच मोडू दिली नाही़ आम्ही त्यांच्यातच ईश्वर अनुभवला़ विनोद खरे, हरीष कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, उदय लातुरे यांनी सुरेश केतकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला़
प्रास्ताविकात व्यंकटसिंह चौहाण यांनी सुरेश केतकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला़ संघाचा विचार त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पेरण्याचे काम केले़