छत्रपती संभाजीनगरकरांना दिवाळी भेट, केतकी माटेगावकरच्या आवाजात 'सुरांचा दीपोत्सव'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:42 IST2025-10-17T19:42:37+5:302025-10-17T19:42:37+5:30
‘लोकमत सुरोत्सवाने’ करा दिवाळीची संगीतमय सुरुवात

छत्रपती संभाजीनगरकरांना दिवाळी भेट, केतकी माटेगावकरच्या आवाजात 'सुरांचा दीपोत्सव'!
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या उजेडात ज्योत पेटवली की फक्त दिव्याची नसते, ती मनाचीही उजळते आणि यंदा ती पेटणार आहे स्वरांच्या सुरेख ज्योतींनी! ‘लोकमत दिवाळी सुरोत्सवाने’ १८ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर, श्वेता दांडेकर आणि गायक अनिरुद्ध जोशी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
हा सोहळा लोकमत भवन, जालना रोड येथे रंगणार असून, संगीत आणि सुरांच्या अद्भूत जगात सफर करण्याची सुवर्णसंधी संभाजीनगरकरांना मिळणार आहे. दिवाळीच्या प्रारंभी आनंद आणि सुरांनी भरलेली ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरणार आहे. रसिकांसाठी हा एक वेगळा आणि उत्साहवर्धक अनुभव ठरेल.
संगीताची मोहोर
हा कार्यक्रम दिशा ग्रुप प्रस्तुत आणि डॉ. भाले यांच्या ‘लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रा. लि. तसेच विक्रम टी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. ‘लोकमत’च्या सातव्या सुरोत्सवाच्या महोत्सवात यंदाही संगीताची मोहोर पडणार आहे. याआधी महेश काळे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर यांसारख्या गायकांनी या मंचावर सुरांच्या जादूने रसिकांची मने जिंकली होती. यावर्षी केतकी माटेगावकर यांच्या माधुर्यपूर्ण आवाजाने दिवाळीचा आरंभ अधिक तेजस्वी आणि हृदयस्पर्शी होणार आहे.
प्रवेश पासवर घ्या संगीत संध्येचा आनंद
प्रवेश फक्त पासधारकांसाठीच आहे. काही जागा आमंत्रितांसाठी राखीव असतील. पासेस लोकमत भवन जालना रोड, दिशा ग्रुप देवगिरी बँकेच्यासमोर, सूतगिरणी चौक, नवकार टाईल्स अँड ग्रॅनाईट, बीड बायपास, वेमिगो प्रीमियम कार केअर ॲप उस्मानपुरा येथे मिळतील. संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी वेळेत उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा आणि दिवाळीच्या उत्सवात संगीताचा सोहळा अनुभवावा.
संभाजीनगरकरांना सुरांची अनोखी भेट
लोकमत सुरोत्सव कार्यक्रमामुळे शहरातील संगीतप्रेमींना दर्जेदार आणि सुरेल अनुभव मिळणार आहे. दिवाळीचा आनंद अधिकच द्विगुणित करणारा हा उपक्रम ठरेल. या संगीतसंध्येशी जोडले गेल्याचा दिशा ग्रुपला आनंद आहे.
-देवानंद कोटगिरे, व्यवस्थापकीय संचालक, दिशा ग्रुप