थापाड्यांचा बोलबाला

By Admin | Updated: November 7, 2016 01:10 IST2016-11-07T00:46:28+5:302016-11-07T01:10:17+5:30

मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांनी आपल्या ‘वृत्ती’ आणि कृतीत आमूलाग्र बदल केल्याचे विविध गुन्हेगारी कारवायांमुळे निदर्शनास येत आहे

Suppress the Thapadas | थापाड्यांचा बोलबाला

थापाड्यांचा बोलबाला


मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांनी आपल्या ‘वृत्ती’ आणि कृतीत आमूलाग्र बदल केल्याचे विविध गुन्हेगारी कारवायांमुळे निदर्शनास येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये औरंगाबादेत वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांना थापाड्यांनी चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांमुळे शहर पोलीसही चक्रावले आहेत. प्रत्येक प्रकरणाचा छडा लावणे हे शहर पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.
औरंगाबाद : आॅफसेट प्रिंटिंग प्रेस आणि शेळीपालन व्यवसायासाठी बनावट कागदपत्रे सादर करून दोन भावंडांनी वसंतराव नाईक भटके, विमुक्त जाती व जमाती महामंडळाकडून तब्बल ९ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक रायभान राठोड आणि प्रकाश रायभान राठोड (रा.आडगाव सरक, ता. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २००८ मध्ये वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे कर्ज प्रस्ताव सादर केले होते. यावेळी अशोक यांनी आॅफसेट प्रिंटिंग प्रेससाठी तर आरोपी प्रकाश यांनी शेळी पालनासाठी कर्जाची मागणी केली होती. खोकडपुरा येथे कार्यालय असलेल्या महामंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना तब्बल ९ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते.
या तपासणीत आरोपींनी कर्ज परतफेडीचा एकही हप्ता भरला नसल्याचे समोर आले. दरम्यान, महामंडळाचे अधिकारी दत्तू आश्रुबा सांगळे यांनी थकबाकीदार कर्जदारांच्या कर्ज फाईल्सच्या तपासणीचे काम सुरू केले आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांनी राठोड यांची प्रिंटिंग प्रेस बायजीपुरा परिसरात असल्याचा स्थळ पाहणी अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारे सांगळे यांनी बायजीपुरा भागात प्रिंटिंग प्रेसची तपासणी केली असता राठोड यांची तेथे प्रेस नसल्याचे समजले. शिवाय महामंडळाच्या नियमानुसार कुटुंबाच्या रेशन कार्डवर नावे असलेल्या एका बेरोजगारालाच कर्ज देता येते. असे असताना राठोड भावंडांनी दोन रेशन कार्ड तयार करून एकाच कुटुंबात तब्बल ९ लाखांचे कर्ज लाटले. शिवाय त्यांनी सादर केलेल्या कोटेशन बिलाची कागदपत्रेही बनावट असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज देशमुख यांनी सांगितले. सांगळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
औरंगाबाद : थाप मारण्यात पटाईत असलेल्या एका भामट्याने चक्क एका व्यापाऱ्यास ४० टेबल फॅनची आॅर्डर देऊन तुम्हाला एक लाख रुपये रोख मिळणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून १६ हजार रुपये लुबाडले. ही खळबळजनक घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास घाटी परिसरात घडली.
पोलिसांनी सांगितले की, सराफा मार्केटमध्ये स्नेहल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे मालक जगदीश मोतीलाल खंडेलवाल हे दुकानात बसलेले असताना अंदाजे ३२ ते ३५ वयाचा एक जण तेथे आला. यावेळी त्या भामट्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास (घाटी) अर्जंट ४० टेबल फॅन्स खरेदी करावयाचे आहेत. यावेळी (पान ५ वर)
औरंगाबाद : इंटरनेट बँकिंगच्या मदतीने विमानाचे तिकीट बुकिंग करीत असलेल्या वृद्धाच्या बँक खात्याची माहिती घेऊन एका भामट्याने त्यांना ३ लाख ३५ हजार १२० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. ही घटना रविवारी सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास सिडको एन-५ भागातील सावरकरनगरात घडली.
सावरकरनगर येथील रहिवासी असलेले ६१ वर्षीय शंकरसिंह चतुरसिंह ठाकूर हे भारतीय आयुर्विमा महामंडळातून विकास अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांना अहमदाबादला जायचे असल्याने रविवारी सकाळी ते पुणे ते अहमदाबाद या विमानाचे तिकीट आॅनलाईन पद्धतीने बुक करीत होते. यावेळी त्यांना एका मोबाईलवरून फोन आला. फोन करणाऱ्याने गगन आहुजा असे स्वत:चे नाव सांगितले. यावेळी त्याने ठाकूर यांच्याशी गोड बोलून तुमचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी बँक खात्याचे डिटेल्स मागितले. ठाकूर यांनी त्यांना माहिती देताच आरोपीने त्यांच्या खात्यातील रोख ३ लाख ३५ हजार १२० रुपये परस्पर काढून घेतले. याबाबतचा मेसेज ठाकूर यांना प्राप्त होताच त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला असता तो बंद असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी थेट सिडको ठाणे गाठून तक्रार नोंदविली. अशा प्रकारे आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार अलीक डे वाढले आहेत. आॅनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला फोनवरून बँकेसंबंधी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर क्राईम सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केले आहे.

Web Title: Suppress the Thapadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.