सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

By संतोष हिरेमठ | Published: December 23, 2023 12:11 PM2023-12-23T12:11:33+5:302023-12-23T12:12:08+5:30

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : प्रस्तावित वेळापत्रक आले समाेर, रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट

Super! New train from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai, Vande Bharat Express to run before 'Janshatabdi' | सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६:०० वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे. जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी ५:५५ वाजता मुंबईसाठी रवाना होणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले. यासंदर्भात ६ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘जनशताब्दीच्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर ही मागणी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रुपाने लवकरच पूर्णत्त्वास जाणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसची प्रस्तावित वेळ
- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : जालन्यावरून पहाटे ५:०५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सकाळी ५:५३ वाजता येईल आणि ५.:५५ वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११:५५ वाजा मुंबईत (सीएसएमटी) पोहोचेल.
- मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस : मुंबईहून (सीएसएमटी) दुपारी १:१० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ७:०८ येईल आणि ७:१० वाजता रवाना होईल. जालना येथे रात्री ८:३० वाजता पोहोचेल.
- ही रेल्वे जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, ठाणे, सीएसएमटी येथे थांबेल.

गती ताशी ६४ कि.मी.
जालना ते मनमाड या १७४ कि. मी. मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० कि. मी.पर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये परवानगी मिळाली. या मार्गावरील विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित वंदे भारत एक्स्प्रेसची गती ही मुंबईकडे जाताना ताशी ६४ कि. मी. आणि मुंबईहून परत येताना ५९ कि. मी. राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परतीची वेळ बदलावी
रेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके म्हणाले, मुंबईहून परतीच्या वेळेत ही रेल्वे दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास निघाली पाहिजे. त्यातून मुंबईत कार्यालयीन कामकाज आटोपून परत येणाऱ्यांची सोय होईल. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, वर्षअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Super! New train from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai, Vande Bharat Express to run before 'Janshatabdi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.