उन्हाचा पारा चाळिशीपार

By Admin | Updated: March 26, 2016 00:55 IST2016-03-26T00:38:35+5:302016-03-26T00:55:30+5:30

बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस ऊन चांगलेच तापू लागले असून, शुक्रवारी पारा ४०.२ वर जाऊन स्थिरावला. त्यामुळे नागरिकांच्या जिवाची अक्षरश: लाही लाही झाली.

Summer merchandise | उन्हाचा पारा चाळिशीपार

उन्हाचा पारा चाळिशीपार


बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस ऊन चांगलेच तापू लागले असून, शुक्रवारी पारा ४०.२ वर जाऊन स्थिरावला. त्यामुळे नागरिकांच्या जिवाची अक्षरश: लाही लाही झाली. या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. ऊन्हापासून बचाव करण्यासाठी थंड पेयांना मागणी वाढली असून, फळांच्या विक्रीतही दुपटीने वाढ झाली आहे.
बुधवारी होळी व गुरूवारी धुलिवंदनाचा सण साजरा झाला. होळी संपताच ऊन वाढते हा नित्याचाच अनुभव यावेळी बीडवासियांनी अनुभवला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला सुरूवात होत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ऊन तापलेले असते. दुपारच्या वेळी तर घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे एरवी गजबजणारे प्रमुख रस्ते दुपारच्या वेळी सामसूम असल्याचे पाहवयास मिळत आहेत. बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळीच घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत. अनेकांनी खासगी कामांच्या वेळेतही बदल केला आहे. चाकरमानी व व्यावसायिक रूमाल, गमछे, टोप्या घातल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवत नाहीत.
वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बाजारपेठ ठप्प असते. सकाळी व सायंकाळीच गिऱ्हाईक खरेदीसाठी येत असल्याने उलाढालीवर परिणाम झाल्याचे महादेव औताडे या व्यापाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. लग्न व बस्त्याच्या खरेदीसाठी मात्र दुपारच्या वेळीही कापड दुकानात गर्दी असते. काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना थंडावा मिळण्यासाठी दुकानांमध्ये कूलर बसविले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी- कर्मचारी कूलर, पंख्याचा आधार घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Summer merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.