‘सुमित, तुम जिओ हजारो साल!’
By Admin | Updated: September 22, 2014 01:18 IST2014-09-22T00:08:58+5:302014-09-22T01:18:51+5:30
औरंगाबाद : सुमित सरदेशपांडे याच्या औषधोपचारावर तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

‘सुमित, तुम जिओ हजारो साल!’
औरंगाबाद : ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुमित सरदेशपांडे याच्या औषधोपचारावर तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमितच्या आयुष्याची दोर मजबूत व्हावी या उद्देशाने ‘लोकमत’ने विडा उचलला. दानशूर मंडळींनी सढळ हाताने मदत करण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता सुमितसाठी तब्बल चार लाख रुपये जमा झाले आहेत.
बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणारे सुशील सरदेशपांडे यांचा मोठा मुलगा सुमित (१३) स.भु. प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. २८ आॅगस्ट रोजी सुमित शाळेत खेळत असताना अचानक बेशुद्ध झाला. त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मागील तीन आठवड्यांपासून त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमधील डॉक्टर उपचार करीत आहेत. त्याच्या वडिलांनी पावणेतीन लाख रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. ते चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका छोट्याशा कंपनीत काम करतात.
सुमितवर आतापर्यंत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, डॉक्टरांनी २८ सप्टेंबर रोजी त्याला परत अॅडमिट करण्याचा सल्ला दिला आहे. युरोपमधील एक औषध सुमितच्या व्हेन्समध्ये सोडायचे आहे. क्लोज सर्जरीचा पहिला टप्पा करणे खूप गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुमितच्या डोक्यात परत भविष्यात रक्तस्राव होऊ नये या दृष्टीने हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. सिग्मा हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत चार लाख रुपये जमा झाले आहेत.
स.भु. शिक्षण संस्थेचा असाही पुढाकार
सुमित सरदेशपांडे स.भु. शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. ज्यावेळी त्याला ब्रेन हॅमरेज झाले त्यावेळी शिक्षकांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले. वेळीच औषधोपचार सुरू झाल्याने सुमित आज चांगल्या स्थितीत आहे.
सुमितच्या कुटुंबियांवर आलेले संकट थोडेसे दूर व्हावे या दृष्टीने स.भु. शिक्षण संस्थेने सर्वाधिक २ लाख ७५ हजार रुपये आज सिग्मा हॉस्पिटलचे सीईओ हेमंत लांडगे यांच्याकडे जमा केले. संस्थेचे सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी ही रक्कम रुग्णालयाकडे सुपूर्द केली. सुमितवर होणाऱ्या औषधोपचारात सूट द्यावी, अशी मागणीही संस्थेतर्फे करण्यात आली.