नवविवाहित शेतमजूर महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:47 IST2019-08-29T17:44:35+5:302019-08-29T17:47:58+5:30
लग्नास अवघे पाच महिने झाले होते

नवविवाहित शेतमजूर महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
वैजापुर : तालुक्यातील भायगाव येथील एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली. मृत नवविवाहित महिलेचे नाव माया सागर मोरे असे आहे. त्यांच्या लग्नाला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.आत्महत्याचे कारण अजुन स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मायाचे एप्रिल महिन्यात तालुक्यातील भायगाव येथील सागर मोरे सोबत लग्न झाले होते.मायाचे माहेर चाळीसगाव असून बुधवारी माया नेहमी प्रमाणे गावातील एका शेतात मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी रोजदारीसाठी गेली होती. सायंकाळी माया घरी परत न आल्याने तिचा रात्री शोध घेण्यात आले.मात्र ती आढळून आली नाही. यानंतर गुरुवारी सकाळी गावातील छगन एकनाथ आंबोरे यांच्या विहिरी जवळ मायाची चप्पल दिसून आली त्यावेळी विहिरित बघितले असता माया पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे घटनेची माहिती वैजापुर पोलिसांना देण्यात आली. सपोनी पाटिल, बिट जमादार मोईस बेग, गुणवंत थोरात, लक्ष्मण गवळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने दुपारी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.या घटनेची नोंद वेजापुर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक मोइस बेग करत आहे.