सिडकोत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:04 IST2020-06-18T19:03:11+5:302020-06-18T19:04:47+5:30
दुपारी घरात आई-वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून झाला वाद

सिडकोत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद: सिडको, एन-७ येथील रहिवासी २५ वर्षीय तरुणीने घरातील छताच्या हुकला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली .ही घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास समोर आली .
प्रतिक्षा भरत काळे (२५, रा. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या पाठीमागे) असे मयत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, एका खाजगी शाळेत नोकरी करत असलेली प्रतिक्षा आज दुपारी घरात आई-वडिलांसोबत गप्पा मारत बसली होती. यावेळी काहीतरी कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने ती तिच्या खोलीत निघून गेली. यानंतर तिने खोलीचे दार आतून बंद केले आणि छताच्या पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून तिने गळफास घेतला.
दुपारी दिड वाजेच्या सुमारास आई-वडिलांनी दार ठोठावले. मात्र, तिने प्रतिसाद न दिल्याने तिचे वडिल पळत पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी तेथे जाऊन दार तोडून पाहिले असता प्रतिक्षाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांच्या वाहनातून प्रतिक्षाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याविषयी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . पोलीस हवालदार फुके तपास करीत आहेत.