तीन जणांची फाशी घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: January 7, 2015 01:04 IST2015-01-07T00:36:50+5:302015-01-07T01:04:08+5:30
मुलाला घेऊन पत्नी माहेरी निघून गेली, तेथे मुलगा आजारी पडल्याने रागाच्या भरात एका जणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लायन्स क्लब कॉलनी येथे घडली.

तीन जणांची फाशी घेऊन आत्महत्या
मुलाला घेऊन पत्नी माहेरी निघून गेली, तेथे मुलगा आजारी पडल्याने रागाच्या भरात एका जणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लायन्स क्लब कॉलनी येथे घडली.
सुनील प्रल्हाद लिहिणार (३६), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सुनील यांचे बारा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुकुंदवाडीतील लायन्स कॉलनी येथे सुनील हे पत्नी आणि मुलासह राहतात.
सात महिन्यांपूर्वी घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात ती आपला लहान मुलगा प्रेमसह माहेरी (रामनगर, जि. जालना) येथे निघून गेली. प्रेम आजारी पडल्याची माहिती सुनील यास मिळाली. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे सदस्य रामनगर येथे प्रेम यास भेटण्यासाठी गेले. सुनील मात्र घरीच थांबला होता. दरम्यान, त्याने साडीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेतला. सोमवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घरातील मंडळी रामनगर येथून घरी परतली तेव्हा सुनीलने आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. हे दृश्य पाहून घरातील मंडळी मोठ्याने रडू लागली. शेजारी लोक त्यांच्या घरी जमा झाले. त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुनीलचा मृतदेह घाटीत हलविला. मंगळवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रगती कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये एका मनोरुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
सोमीनाथ सांडू जाधव (४०, रा. प्रगती कॉलनी, बेगमपुरा), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, सोमीनाथ यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांच्यावर मनोविकारतज्ज्ञाकडे उपचार सुरू होते.
पुणे येथील विभागीय मनोरुग्णालयातही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज सकाळी ते फिरायला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. प्रगती कॉलनी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमीनाथ हे त्या इमारतीमध्ये गेले. तेथे त्यांनी साडीने गळफास घेतला. काही वेळानंतर बांधकाम मजूर काम करण्यासाठी आले. त्यांना ही घटना दिसली. त्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना दिली.
पोलिसांनी ही बाब सोमीनाथ यांच्या नातेवार्ईकांना कळविली. त्यांनी सोमीनाथ यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हे.कॉ. जाधव या घटनेचा तपास करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (निलीट) संस्थेच्या एका अस्थायी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रशीद बेग नजीर बेग (४०, रा.भीमनगर, भावसिंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रशीद बेग हे ‘निलीट’ संस्थेत अस्थायी कर्मचारी होते. आठ दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. त्यामुळे त्यांचे सहकारी कर्मचारी लोकचंद यांनी त्यांना फोन करून कामावर येणार अथवा नाही, याबाबत चौकशी केली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रशीद हे घरातून बाहेर पडले. तेथून ते सरळ गोगाबाबा टेकडी परिसरात गेले. तेथे त्यांनी साडीने झाडाला बांधून गळफास घेतला. बेगमपुरा पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीत संस्थेचे कर्मचारी लोकचंद, सचिन खटके, सुपरवायझर डिघुळे आणि सुरक्षारक्षक दांडगे यांची नावे आहेत. हे चार लोक आपल्या वडिलांना त्रास देत होते, अशी माहिती त्यांच्या मुलाने बेगमपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस नाईकाचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : राजीवनगर रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक हवालदाराला नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचविता आले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
के.एम. सोनटक्के (बक्कल नंबर १८५०), असे त्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनटक्के हे शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. ते सोमवारी रात्री राजीवनगर रेल्वे रुळावर गणवेशातच गेले. आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत सोनटक्के रेल्वे रुळावर उभे असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाजूला ओढले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी त्यांना आयुक्तालयातील सहायक आयुक्त अंबादास गांगुर्डे यांच्यासमोर हजर करण्यात आले. याप्रसंगी गांगुर्डे यांनी त्यांची समजूत काढली.