जावयाची सासर्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:49 IST2018-03-20T13:41:16+5:302018-03-20T13:49:46+5:30
सासर्याच्या घरी जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथील साई वैभवनगरी येथे घडली.

जावयाची सासर्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : सासर्याच्या घरी जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथील साई वैभवनगरी येथे घडली.
राहुल गोपीनाथ तायडे (३२, रा. सीतानगर, वडगाव कोल्हाटी) असे आत्महत्या करणार्या जावयाचे नाव आहे. राहुल व त्याचा साला विशाल शेंडकर हे दोघे खिडक्या व दरवाजे बसविण्याचे काम करतात. राहुल तायडे, विशाल शेंडकर व दुकानात काम करणार्या एका कामगाराने सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये सोबत जेवण केले. जेवणानंतर राहुलने साला विशाल यास मी तुमच्या घरी जाऊन आराम करतो, असे सांगून सासरी गेला होता. यानंतर अर्ध्यातासाने विशाल हा घरी गेला तेव्हा मेव्हणा राहुलने गळफास घेतलेला दिसला.
घाबरलेल्या विशालने आरडाओरडा करून शेजार्याच्या मदतीने मेव्हण्यास खाली उतरविले. एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनेची माहिती दिली. फौजदार संतोष कसबे, सहा. फौजदार एस.आर. सुरडकर व पोलीस कर्मचार्यांनी राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
पत्नी व सासू-सासरे लग्नासाठी बाहेरगावी
राहुल तायडे हा पत्नी शीतल व मुलगा श्लोक (३) यांच्यासह वडगावच्या सीतानगरात वास्तव्यास आहे. एका नातेवाईकाचे अंबड (ता. जामखेड) येथे लग्न असल्यामुळे शीतल मुलाला सोबत घेऊन आपल्या आई-वडिलांसह रविवारी गावी गेली होती. राहुल व त्याचा साला विशाल शेंडकर हे दोघे घरी होते. सोमवारी दुपारी जेवणानंतर राहुल आराम करण्याच्या बहाण्याने विशालच्या घरी गेला होता. तेथे त्याने पलंगावर खुर्ची ठेवून छताला पडद्याने बांधून गळफास घेतला.
पोलिसाकडून शोध सुरू
पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृताच्या खिशात व घरात काहीही सापडले नाही. फौजदार संतोष कसबे यांनी मृताचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्याने आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.